अतिशय नियोजनबद्ध सायकलिंग करीत मुंबईच्या ओंकार जाधव याने सुवर्णमहोत्सवी मुंबई-पुणे सायकल शर्यत जिंकण्याचे स्वप्न रविवारी साकारले. त्याने १५७.५ किलोमीटरचे अंतर चार तास १३ मिनिटे २२.३ सेकंदात पार केले. सांगलीचा दिलीप माने हा ‘घाटाचा राजा’ किताबाचा मानकरी ठरला.
महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या या प्रतिष्ठेच्या सायकल शर्यतीत शेवटपर्यंत विलक्षण चुरस पाहावयास मिळाली. गतवर्षी तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या ओंकारने अन्य पाच स्पर्धकांना केवळ एका चाकाच्या अंतराने पराभूत केले. जेठाराम (आंध्र प्रदेश), हरप्रीत सिंग, रवींद्र कारंडे, दिबेन मितेई (सेनादल) व दिलीप माने (सांगली) हे अनुक्रमे दोन ते सहा क्रमांकांचे मानकरी ठरले.
गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) येथून सकाळी ७.३० वाजता या शर्यतीस प्रारंभ झाला. त्यावेळी सव्वाशे स्पर्धकांनी शर्यतीस सुरुवात केली. चेंबूरच्या आर. के. स्टुडिओपर्यंतचा टप्पा स्पर्धाविरहित होता. तेथून खऱ्या अर्थाने शर्यतीस सुरुवात झाली. पनवेलपर्यंतचा टप्पा सांगलीच्या हुसेन कुरबू याने प्रथम क्रमांकाने पार केला. सेनादलाचे अमरीश सिंग व वीरेंद्र सिंग यांनी त्याच्यापाठोपाठ हा टप्पा ओलांडला. यंदा या शर्यतीत स्पर्धकांनी सुरुवातीपासूनच वेग घ्यावा यासाठी वाशीपासून पाम बीचमार्गे कोकण भवन व तेथून पुन्हा मुंबई-पुणे रस्ता असा साडेपाच किमीचा टप्पा वाढविण्यात आला होता. नाडल गावाचा टप्पा नव्याने या शर्यतीत बक्षिसासाठी घेण्यात आला होता. तेथेही हुसेन कुरबू व अमरीशसिंग हेच पहिल्या दोन स्थानावर होते. बोरघाटात दिलीप माने याने अन्य स्पर्धकांना मागे टाकले व ‘घाटाचा राजा’ किताब मिळवत ३१ हजार रुपयांची कमाई केली. अनिलकुमार व जेठाराम हे त्याच्यापाठोपाठ घाट ओलांडून पुढे आले. घाटात दहाव्या क्रमांकावर असलेल्या ओंकार जाधव याने घाटानंतर वेग वाढविला व आघाडीवर असलेल्या पाच-सहा जणांच्या जथ्याला गाठले. कामशेतला हरप्रीत सिंग, दिबेन मितेई व ओंकार हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर होते. देहूरोडजवळ ओंकारने अन्य दोन स्पर्धकांना मागे टाकले आणि आघाडी घेतली. त्याच्यापाठोपाठ पाच-सहा खेळाडूही होते. तेथून शेवटपर्यंत ओंकारने आघाडी टिकवत विजेतेपद पटकाविले आणि एक लाख रुपयांची कमाई केली.
आज वडील पाहिजे होते -ओंकार
माझे वडील पोलिस खात्यात नोकरीला होते. नऊ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. मी खेळात नैपुण्यवान कामगिरी करावी अशी त्यांची इच्छा होती. ती इच्छा येथे मी पूर्ण केली. माझे यश पाहण्यासाठी ते हवे होते असे ओंकार जाधव याने सांगितले. तो जितेंद्र अडसुळे व जर्मन प्रशिक्षक मासूद यांच्या मार्गदर्शनाखाली रेड अँड व्हाईट सायकलिंग क्लबमध्ये सराव करीत आहे. गेले चार वर्षे तो या शर्यतीत भाग घेत आहे. ओंकार याने आतापर्यंत चार वेळा राज्यस्तरावर रोड रेस शर्यत जिंकली आहे. तो जर्मन बनावटीची सायकल चालवितो. २३ वर्षीय खेळाडू ओंकार याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. त्याची आई रेश्मा मुंबईत पोलिस खात्यात नोकरीस आहेत.
तेरा वर्षांच्या हिरेनचे अफलातून यश
मुंबईच्याच हिरेन जाधव या १३ वर्षीय शालेय खेळाडूने ही शर्यत पूर्ण करणारा सर्वात लहान खेळाडू होण्याचा मान मिळविला. त्याला सायकलिंगमध्येच कारकीर्द करावयाची आहे आणि त्यासाठी तो आतापासूनच दररोज दोन ते तीन तास सायकलिंगचा सराव करतो.

Story img Loader