कनिष्ठ गटाच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेतील बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी भारताला मंगळवारी दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळविणे अनिवार्य आहे.
मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताला पहिल्या लढतीत नेदरलँड्सविरुद्ध २-३ असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या लढतीत कॅनडावर निसटता विजय मिळविला आहे. नेदरलँड्सने दोन सामने जिंकून यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. भारत व कोरिया यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी कोरियावर मात करावी लागणार आहे. त्या दृष्टीनेच त्यांना या लढतीत सर्वोत्तम कौशल्य दाखवावे लागेल.
कॅनडाविरुद्धच्या लढतीत भारताने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या होत्या. तसेच या लढतीत त्यांचा पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्याबाबत असलेला दुबळेपणा पुन्हा सिद्ध झाला होता. या सामन्यात त्यांना शेवटच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरने हात दिला होता. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघास कोरियाविरुद्ध सर्व संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा लागणार आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रेग क्लार्क यांनीही भारतीय खेळाडू पेनल्टी कॉर्नरबाबत कमकुवत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘कॅनडाविरुद्ध आमच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या अन्यथा आम्ही हा सामना किमान दोन गोलांच्या फरकाने जिंकला असता.
कोरियाचे खेळाडू अतिशय धोकादायक खेळ करतात. केव्हाही सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध गाफील राहणे चुकीचे ठरेल. तथापि, या लढतीत आमचे खेळाडू चांगला खेळ करतील अशी मला खात्री आहे. कोरियाच्या खेळाडूंमध्ये सातत्य आहे त्यामुळेच आम्हालाही अचूकता दाखवावी लागणार आहे.’’