मुंबईचं वानखेडे मैदान….अखेरच्या टी-२० सामन्यासाठी प्रेक्षकांची गर्दी…वातावरणात किंचीत गारवा अशा परिस्थितीत भारताचं आघाडीचं त्रिकुट मैदानात अक्षरशः चौकार-षटकारांची आतषबाजी करत. खेळपट्टीवर अशा पद्धतीने जम बसवला जातो की अखेरच्या फळीतल्या शमीला संधी मिळाली असती तर त्याने चौकार-षटकार हाणले. पण सगळं काही सुरळीत आणि मनासारखं होत असतानाही माती खाणारा कोणीतरी हवा असतो, नाही का?? बरोब्बर ओळखलत….अखेरच्या सामन्यातही ऋषभ पंतने ही कामगिरी इमाने इतबारे पार पाडली आहे.

लहानपणी आपण सर्वांनी पाचरीत शेपुट अडकलेल्या माकडाची गोष्ट ऐकलेली आहे. पाचर काढली तर वेदना आणि शेपूट तुटली तर नाचक्की अशी काहीशी परिस्थिती माकडाची झाली होती. टीम इंडियात ऋषभ पंतची अवस्था सध्या याच माकडासारखी झालेली आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूची जागा चालवताना खांद्यावर अपेक्षांचं अवास्तव ओझं आणि खेळातली अपरिपक्वता यामुळे ऋषभ सध्या टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला आहे.

चुकीच्या वेळी भारतीय संघात स्थान –

भारतीय क्रिकेटला सुगीचे दिवस आणण्यात महेंद्रसिंह धोनीने महत्वाची भूमिका बजावली आहे यात काहीच वाद नाही. त्याची आक्रमक फलंदाजी, यष्टीमांगची चपळता, आणि सामन्याचं पारडं नेमकं कोणत्या दिशेने झुकतंय याचा अंदाज हे वाखणण्याजोगं आहे. मात्र प्रत्येक खेळाडूला काही मर्यादा असतात. दुर्दैवाने धोनीच्या चाहत्यांना हे मान्य नाही. एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक खेळाडूचा खेळ कमी होत जातो. २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीपासून धोनीची फलंदाजीतली कामगिरी पाहिली तर आपल्याला याचाच प्रत्यय येईल.

निवड समितीने काळाची पावलं ओळखत, २०१७ पासून धोनी आणि पंत यांचा खुबीने वापर करायला हवा होता. २०१९ विश्वचषकासाठी धोनी संघात असणं गरजेचं होतं, मात्र त्याआधी काही सामन्यांमध्ये ऋषभ पंतला संधी देता आली असती. २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात ऋषभ पंतची भारतीय संघात निवड झाली, मात्र संपूर्ण दौऱ्यात त्याला एकही सामना खेळता आला नाही. या दौऱ्यात त्याला संधी देऊन, हळुहळु त्याचा खेळ सुधारण्याकडे लक्ष देता आलं असतं. मात्र एखादा खेळाडू जेव्हा खेळापेक्षा मोठा होतो तेव्हा गोष्टी हाताबाहेर जातात. धोनीला बाहेर कसं बसवायचं हा यक्षप्रश्न निवड समितीसमोर आला आणि पंतचा पर्याय पुन्हा एकदा बासनात गेला.

अपेक्षांचं अवास्तव ओझं –

ऋषभ पंतला यादरम्यानच्या काळात संधी मिळालीच नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. मात्र त्याला मिळालेल्या संधींमध्ये सातत्य नव्हतं. लिग क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात मोठा फरक आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेदरम्यान पंतने शतकी खेळी करत स्वतःला सिद्ध केलं. मात्र प्रत्येकवेळी ऋषभ पंतच्या कामगिरीची विश्लेषण हे ऋषभ पंत म्हणून नाही तर धोनीचा वारसदार म्हणून केलं गेलं.

धोनी आणि पंतची तुलना कऱणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. धोनीच्या हाती भारतीय संघाची कमान होती, आणि कालानुरुप धोनीच्या खेळात सुधारणा झाली. मात्र पंतला पुरेशी संधी न देता त्याने धोनीसारखं यष्टीरक्षण करावं अशी अपेक्षा करणं कितपत रास्त आहे?? २०१९ विश्वचषकानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली, आणि निवड समितीने कठोर पावलं उचलत आता पंतला पहिली पंसती मिळेल असं जाहीर केलं. मात्र आतापर्यंत मिळालेल्या संधींमध्ये निव्वळ, केवळ आणि फक्त निराशाच केल्यामुळे अल्पावधीतच पंतला पर्याय शोधण्याची वेळ निवड समितीवर आलेली आहे.

याच जागेवर योग्यवेळी पंतला संधी देऊन त्याला तयार केलं असतं तर आज अशी परिस्थिती दिसली नसती. ऋषभचं फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचं तंत्र सदोष आहे. हे सुधारण्यासाठी सध्याचं संघ व्यवस्थापन कितपत प्रयत्न करतंय???

योग्य वेळी निर्णय घेण्याची गरज –

२०२० साली ऑस्ट्रेलियात भारतीय संघ टी-२० विश्वचषक खेळेल. त्याआधी टीम इंडियात सर्वकाही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही. ऋषभचं सतत अपयश हे उठून दिसायला लागलं आहे. प्रत्येक सामन्यानंतर ऋषभ पंत सोशल मीडियावर ट्रोल होतोय. एखाद्या खेळाडूसाठी ही खूप वेदनादायी गोष्ट आहे, यात काहीच शंकाच नाही. मात्र यामधून पंतला सावरायचं असेल, तर त्याला सक्तीची विश्रांती देणं गरजेचं आहे…यात काहीच वाद नाही.

जोपर्यंत धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत नाही तोपर्यंत पंत आणि धोनीची तुलना होणारच. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने, पंतशी चर्चा करुन त्याला पुढचे काही महिने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळायला लावायला हवं. रणजी करंडक आणि अन्य स्थानिक टी-२० स्पर्धांमध्ये खेळून पंत पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करु शकतो. मात्र पुन्हा एकदा हरीदासाची कथा मुळ पदावर….पंतला विश्रांतीची गरज आहे हे सांगणार कोण??? का पंतला संघाबाहेर न करण्यामागे कर्णधार आणि प्रशिक्षकांची काही वेगळी कारणं आहेत??

ऋषभलाही स्वतःत बदल करण्याची गरज –

जेव्हा समोरच्याकडे आपण बोट दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात अशी मराठीत म्हण आहे. ऋषभ पंत या उदाहरणात अगदी चपखल बसतो. त्याच्याकडून धोनीसारखा खेळ व्हावा अशी चाहत्यांची अपेक्षा असली तरीही पंतचं एक खेळाडू म्हणून तंत्र हे सर्वोत्तम नाही. यष्टीरक्षक हा संघाचा अर्धा कर्णधार असतो असं म्हटलं जातं.

मात्र यष्टींमागे उभं राहण्याचं तंत्र, चेंडूचा अंदाज, DRS साठी चुकीचे सल्ले….ऋषभ पंतची ही कामगिरी पाहता त्याला अजुनही स्वतःच्या खेळात सुधारणा करणं गरजेचं आहे. अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी असं वारंवार बोलूनही दाखवलं आहे. यष्टींमागे उभं राहून बाष्कळ बडबड करायची, फलंदाजीत आडवे-तिडवे फटके खेळायचे…या सर्व गोष्टींमुळे तुम्ही चर्चेत राहु शकता पण संघात टिकून राहु शकत नाही. वेळ निघून जायच्या आधी ऋषभ पंतने हे ओळखलं तर चांगलंच आहे.

दिनेश कार्तिक-पार्थिव पटेल यासारख्या यष्टीरक्षकांनी धोनीच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यापैकी दिनेश कार्तिक हरहुन्नरी यष्टीरक्षक होता. मात्र धोनीने पाठीमागे होऊन स्वतःचा खेळ सुधारत संघात आपलं स्थान पक्क केलं. यानंतर दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल हे यष्टीरक्षक शर्यतीबाहेरच फेकले गेले. काहीकाळानंतर यांनीह भारतीय संघात स्थान मिळालं, मात्र त्यांच्याकडे ठोस पर्याय म्हणून कधीही बघितलं गेलं नाही.

यापैकी दिनेश कार्तिक अजुनही स्थानिक क्रिकेटमध्ये खेळून स्वतःचं आव्हान टिकवून आहे. टीम इंडियात जागा मिळवण्याची आशा त्याने अद्याप सोडलेली नाही. संजू सॅमसनही चांगल्याच फॉर्मात आहे. अशा परिस्थितीत ऋषभने वेळेतच सुधारणा केली नाही तर काही काळाने तो देखील शर्यतीतून बाहेर पडू शकतो. बाकी काय, सुज्ञास अधिक काय सांगावे…