जेतेपदाचे दावेदार असणाऱ्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत चौथ्या फेरीत आगेकूच केली. पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या डेव्हिड फेररनेही अंतिम सोळा जणांमध्ये स्थान मिळवले आहे. महिलांमध्ये कॅरोलिन वोझ्नियाकीला पराभवाला सामोरे जावे लागले.
अमेरिकन खुल्या स्पर्धेची पाच जेतेपदे नावावर असलेल्या मात्र यंदा सातवे मानांकन मिळालेल्या फेडररने फ्रान्सच्या अॅड्रियन मॅनारिओचा ६-३, ६-०, ६-२ असा धुव्वा उडवला. सर्वच आघाडय़ांवर अॅड्रियनला निष्प्रभ करत फेडररने वर्चस्व गाजवले. चौथ्या फेरीत फेडररची स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोशी लढत होणार आहे. एकाच गटात असल्याने फेडरर आणि नदाल उपांत्यपूर्व फेरीतच एकमेकांशी सामोरे येण्याची शक्यता आहे. रॉब्रेडोविरुद्धची लढत जिंकल्यास फेडरर-नदाल मुकाबल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
केवळ क्ले कोर्टपुरतीच आपली मक्तेदारी नाही, हे सिद्ध करण्यासाठी आतूर असलेल्या नदालने क्रोएशियाच्या इव्हान डोडिगवर ६-४, ६-३, ६-३ अशी सहज मात केली. द्वितीय मानांकित नदालने सर्वच फटक्यांचा खुबीने वापर करत डोडिगला नामोहरम केले. पुढच्या फेरीत नदालची लढत फिलीप कोहलश्रायबरशी होणार आहे. प्रचंड उष्मा असलेल्या वातावरणात झालेल्या या सामन्यात घाम टिपण्यासाठी पुरेसे टॉवेल नसल्याची तक्रार नदालने केली. याशिवाय कोर्टजवळच असणाऱ्या विमानतळावर आकाशात झेप घेणाऱ्या जेट विमानांच्या घरघराटामुळे एकाग्रतेत व्यत्यय येत असल्याचे नदालने सांगितले. ‘‘इव्हानविरुद्धचा सामन्यात र्सवकष एकाग्रतेसह खेळलो. माँन्ट्रेअल स्पर्धेत त्याने मला नमवले होते. स्पर्धेत आतापर्यंतची हा माझा सर्वोत्तम खेळ होता,’’ असे नदालने सांगितले.
नदालचा मित्र आणि डेव्हिस चषकातील सहकारी डेव्हिड फेररनेही आगेकूच केली. पात्रता फेरीचा अडथळा पार करून दाखल झालेल्या कझाकिस्तानच्या मिखाइल कुकुशिनवर त्याने ६-४, ६-३, ४-६, ६-४ असा विजय मिळवला. चौथ्या मानांकित फेररने यंदा फ्रेंच खुल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. मात्र जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली होती. या स्पर्धेच्या निमित्ताने अधुरे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याची संधी फेररला आहे. पुढील फेरीत फेररचा सामना जॅन्को टिप्सारेव्हिचशी होणार आहे.
महिलांमध्ये सहाव्या मानांकित डेन्मार्कच्या कॅरोलिन वोझ्नियाकीला पराभवाचा धक्का बसला. पात्रता फेरीतून दाखल झालेल्या इटलीच्या कॅमिला जिओरजीने वोझ्नियाकीला ४-६, ६-४, ६-३ असे पराभूत केले. द्वितीय मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने अलिझ कॉर्नेटला ६-७ (२-७), ६-३, ६-२ असे नमवत चौथी फेरी गाठली.
अॅना इव्हानोव्हिकने ख्रिस्तिना मॅकहालेवर ४-६, ७-५, ६-४ असा विजय मिळवला.
भारतीयांसाठी एक ‘विजयी’ दिवस
न्यूयॉर्क : लिएण्डर पेस, सानिया मिर्झा, रोहना बोपण्णा आणि दिविज शरण या भारतीयांसाठी शनिवारचा दिवस विजयी दिन ठरला. चौथ्या मानांकित पेस-राडेक स्टेपानेक जोडीने जर्मनीच्या डॅनियल ब्रँण्ड्स आणि ऑस्ट्रियाच्या फिलिप ओसवाल्डवर ४-६, ६-३, ६-४ अशी मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुढील फेरीत त्यांचा मुकाबला मायकेल लॉइड्रा आणि निकोलस माहुत जोडीशी होणार आहे. सहाव्या मानांकित रोहन बोपण्णा आणि फ्रेंच साथीदार एडय़ुओर्ड रॉजर-व्ॉसेलिन जोडीने रशियाच्या निकोलय डेव्हडेन्को- मिखाइल इल्गिन जोडीला ७-६ (२), ७-६ (०) असे नमवले. दिविज शरण आणि चायनीज तैपेईचा साथीदार येन ह्य़ुस्न ल्यू जोडीने इस्त्रायलच्या जोनाथन एलरिच आणि अँडी राम जोडीवर ६-४, ५-७, ७-६ (२) असा विजय मिळवला. महिला दुहेरीत दहाव्या मानांकित सानिया मिर्झाने चीनच्या जि झेंगच्या साथीने खेळताना हंगेरियाच्या कॅटालिन मारोसी आणि अमेरिकेच्या मेगन मोल्टन-लेव्हीचा ६-३, ७-५ असा पराभव केला. आता त्यांची लढत जर्मनीच्या अॅना ग्रोनफील्ड आणि चेक प्रजासत्ताकच्या क्वेटा पेश्चक जोडीशी होणार आहे.