श्रीलंकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर वादग्रस्त डीआरएसच्या (पंचांच्या निर्णयाचा पुनर्आढावा) उपयुक्ततेबाबत गांभीर्याने विचार करता येईल, असे मत भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.शनिवारी भारताने श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी ६३ धावांनी गमावली. या सामन्याचे चित्र पालटणारा सामनावीर दिनेश चंडिमल पाच धावांवर असताना त्याचा बॅट-पॅडला लागून रविचंद्रन अश्विनने टिपलेला झेल पंच निगेल लिआँग यांनी अवैध ठरवला होता. याचप्रमाणे लोकेश राहुलचा झेल फॉरवर्ड शॉर्ट लेगला झेल घेण्यापूर्वी त्याच्या पॅडला लागून चेंडू गेला होता. आमची फलंदाजी खराब झाली असल्यामुळे डीआरएसच्या अस्तित्वाबाबत चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, असे स्पष्टीकरण कोहलीने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत दिले.‘‘चालू मालिकेत आपण डीआरएस वापरत नाही, परंतु या क्षणी याविषयी चर्चा करावी असे मला वाटत नाही. श्रीलंकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर आम्ही एकत्रित बसून याच्या उपयुक्ततेबाबत चर्चा करू,’’ असे कोहलीने सांगितले.‘‘पहिल्या कसोटीतील पराभवाला आमचा खेळ प्रामुख्याने जबाबदार आहे. त्यामुळे डीआरएस किंवा अन्य कोणत्याही मुद्दय़ांबाबत या कसोटीची चर्चा होऊ शकत नाही. फिरकी गोलंदाजीचा आम्ही आत्मविश्वासाने सामना करू शकलो नाही,’’ असे तो पुढे म्हणाला.

Story img Loader