ट्वेन्टी-२०  महिला विश्वचषक

गतवर्षी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक

एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाच्या भारतीय महिला संघाच्या स्मृती ताज्या असतानाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात हे दोन्ही संघ शुक्रवारी आमनेसामने येत आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या त्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

२०१७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला इंग्लंडकडून अटीतटीच्या लढतीत ९ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अगदी हातातोंडाशी आलेले विजेतेपद हिरावले गेल्याची खंत भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या मनात आहे. त्यानंतर भारतीय संघाने आतापर्यंत दमदार वाटचाल कायम ठेवली आहे. या विश्वचषकातदेखील भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या मजबूत संघांना सहजपणे हरवत अत्यंत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या प्रकारात भारतीय संघ अधिक मजबूत असल्याने भारताला या सामन्याचा अडथळा पार करीत अंतिम फेरी गाठता येईल, असा संघातील खेळाडूंना विश्वास आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि माजी कर्णधार मिताली राज या भारतीय संघाच्या प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यात त्यांच्यावर अधिक जबाबदारी राहणार असल्याची त्यांना कल्पना आहे.

हरमनप्रीतने तर या विश्वचषकातील चार सामन्यांमध्ये मिळून सर्वाधिक १६७ धावा केल्या असून त्यात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील तडाखेबंद शतकाचा समावेश आहे. त्याखालोखाल स्मृती मानधना हिने एकूण १४४ धावा केल्या असून ती सर्वोच्च धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत विश्रांती दिलेल्या अनुभवी मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पुन्हा खेळवले जाण्याची शक्यता आहे. फिरकी गोलंदाज अनुजा पाटीलच्या जागेवर मितालीला खेळवले जाण्याची शक्यता आहे.

नूतन प्रशिक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात एकच जलदगती गोलंदाज खेळवण्याचा प्रयोग चांगलाच यशस्वी होत आहे. भारतीय फिरकी गोलंदाजांनी सर्व सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यात पूनम यादवने ८ तर दायलान हेमलताने ५ बळी मिळवत संघाच्या विजयात भरीव योगदान दिले आहे. भारताकडून जलदगती गोलंदाजांपैकी अरुंधती रेड्डीने १० षटके आणि मानसी जोशीने ३ षटके अशी अवघी १३ षटके गोलंदाजी केली आहे. मात्र, आतापर्यंतचे सर्व सामने भारताने गयानातील पोव्हिडन्सच्या खेळपट्टीवर खेळले होते. तर उपांत्य फेरीचा सामना अ‍ॅँटिग्वातील नॉर्थ साऊंड मैदानावर आणि दिवस-रात्र स्वरूपात खेळावा लागणार आहे. त्यामुळे हा फरक भारताच्या दृष्टीकोनातून अधिक लाभदायक ठरतो की हानीकारक ते या उपांत्य सामन्याच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे.

भारतीय संघ-

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, मिताली राज, दीप्ती शर्मा, दायलन हेमलता, वेदा कृष्णमूर्ती, अरुंधती रेड्डी, राधा यादव, पूनम यादव, एकता बिश्त, तानिया भाटिया, मानसी जोशी, देविका वैद्य, अनुजा पाटील

b

हिथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्युमॉन्ट, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, टॅश फारान, क्रिस्टी गॉर्डन, जेनी गन, डॅनिएल हॅझेल, अ‍ॅमी जोन्स, नटाली स्किव्हर ,अन्य श्रबसोल, लिन्से स्मिथ, फ्रान विल्सन, लॉरेन विनफिल्ड, डॅनिअल वॅट

*  सामना- सकाळी ५.३० वा.’

इंग्लंडचा भर जलदगती गोलंदाजीवर

भारताने फिरकीवर अवलंबून राहण्याचे धोरण ठेवलेले असताना इंग्लंडची मदार ही प्रामुख्याने त्यांच्या जलदगती गोलंदाजीवर राहणार आहे. त्यात अन्या श्रबसोलने ७ बळी तर नटाली स्किव्हरने ४ बळी यांचा प्रमुख समावेश आहे. या दोघींनी अत्यल्प धावा देत बळी मिळवण्याच्या कामगिरीत सातत्य राखले आहे. त्यांच्यामुळेच बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांना १०० धावांच्या आत रोखणे इंग्लंडला शक्य झाले होते. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजीची अद्याप तितकीशी परीक्षा झालेली नाही. त्यामुळे उपांत्य सामना हा दोन्ही संघांची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.