नवी दिल्ली : निवृत्त क्रिकेटपटूंच्या परदेशी ट्वेन्टी-२० लीगमधील सहभागाबाबतच्या धोरणात बदल करण्याबद्दल ‘बीसीसीआय’ ७ जुलै रोजी होणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.‘बीसीसीआय’ नोंदणीकृत खेळाडूला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ‘आयपीएल’सह देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच परदेशातील लीगमध्ये खेळता येते. गेल्या महिन्यात ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील अंबाती रायडूने भारतातील क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
तो पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटमध्ये (एमएलसी) टेक्सास सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणार आहे. मात्र, रायडू आणि त्याच्यासारख्या अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीमुळे देशांतर्गत क्रिकेटचा स्तर खालावण्याची भीती आहे. त्यातच जगभरात ट्वेन्टी-२० लीगची वाढती संख्या लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळणारे अधिकाधिक भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ आता देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त न होताच खेळाडूंना परदेशी लीगमध्ये सहभागाची मुभा देण्याबाबत विचार करत आहे.