खरं तर ऑलिम्पिक हा कोणत्याही खेळाडूसाठी कारकीर्दीचा परमोच्च मानबिंदू असतो. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट. मात्र लंडन ऑलिम्पिकसाठी भारतीय टेनिस संघाच्या निवडीच्या निमित्ताने खेळाडू आणि टेनिस संघटना यांच्यात झालेल्या आरोपांच्या चिखलफेकीतून टेनिसचे अक्षरश: वस्त्रहरण झाले. पेस-भूपती-सानिया मिर्झा या तिघांबद्दल हे वर्ष सुरू होईपर्यंत आपल्या मनात आदर होता. मात्र २०१२ संपताना वैयक्तिक स्वार्थासाठी जगणारे तीन टेनिसपटू, हीच त्यांची ओळख आपल्या मनात घर करून राहणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये टेनिससाठी कोणतीही पात्रता स्पर्धा नसते. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या क्रमवारीनुसार एकेरीत अव्वल ३२ तर दुहेरीत अव्वल १६ जणांनाच ऑलिम्पिकवारीची संधी मिळते. यंदा हा मान फक्त लिएण्डर पेसला मिळाला. महेश भूपती-रोहन बोपण्णा यांचे क्रमवारीतील स्थान एकत्र केल्यानंतर त्यांना ऑलिम्पिकचे दार किलकिले होणार होते आणि इथूनच सुरू झाले भारतीय टेनिसमधले आरोपप्रत्यारोपांचे गलिच्छ पर्व.
पेस-भूपती हे भारताचे पदकाचे आशास्थान. त्यांचं वेगळं होणं आणि एकत्र येणं आपल्या अंगवळणी पडलेलं. मात्र यंदा भूपतीने पेसबरोबर खेळणार नाही, अशी भूमिका घेतली. ऑलिम्पिकमध्ये खेळेन तर बोपण्णाबरोबरच, अशी आडमुठी भूमिका भूपतीने घेतली. भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) भूपती आणि बोपण्णा दोघांनाही पेसबरोबर खेळण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपला हट्ट सोडला नाही. आपल्याबरोबर कुणीही खेळण्यास तयार नाही, हे लक्षात घेतल्यानंतर पेसने कुणाबरोबरही खेळण्याची तयारी दाखवली. खरं तर ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायला मिळणे, हा अतीव आनंदाचा क्षण मात्र या भूपती-बोपण्णाला देशहित, देशासाठी पदक मिळवणे, या सगळ्याचाही विसर पडला. संघटनेपेक्षा ते शिरजोर झाले. सानिया मिर्झानेही आपले तोंड उघडले आणि आगीत आणखी तेल ओतले. हे प्रकरण मिटेपर्यंत प्रत्येक जण एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग होता. त्यामुळेच ‘ऑलिम्पिक नको पण हा तमाशा आवरा’ अशी स्थिती पाहायला मिळत होती. खेळाडूंच्या वैयक्तिक अहंभावापुढे एआयटीए नमली आणि त्यांनी लंडनसाठी दुहेरीचे दोन संघ (पेस-विष्णू वर्धन, भूपती-बोपण्णा) पाठवण्याचा निर्णय घेतला. सानिया मिर्झा आणि सोमदेव देववर्मनला ‘वाइल्डकार्ड’ मिळवून देण्यात आले. भारताच्या सर्व टेनिसपटूंना प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला आणि उरलीसुरली इभ्रतही धुळीस मिळाली.
या वादाला खतपाणी घालत एआयटीएने सूडास्त्र बाहेर काढले. ऑलिम्पिकसाठी खेळाडूंची मनधरणी करूनही त्यांची विनंती धुडकावणाऱ्या भूपती-बोपण्णा जोडीला धडा शिकवण्याच्या हेतूने एआयटीएने या दोघांना डेव्हिस चषक संघातून डच्चू दिला. त्याचबरोबर २०१४पर्यंत भारतीय संघाच्या निवडीसाठी भूपती आणि बोपण्णाचा विचार केला जाणार नाही, हेही स्पष्ट केले. भूपती-बोपण्णाला हा दणका होता. भूपतीला कारवाईची धग तात्काळ जाणवली आणि त्याने बोपण्णाला बाजूला ठेवून एआयटीएवर पलटवार केला. कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या भूपतीने या ‘अघोषित बंदी’विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा एल्गार केला. ही बंदी माझ्याविरोधातील वैयक्तिक आकसातून, अशी टिप्पणीही त्याने केली. आता हा वाद सुरूच राहणार आहे.. पण भूपतीने मात्र पुढील वर्ष हे आपले टेनिस कारकीर्दीतले अखेरचे वर्ष असेल, अशी घोषणा केली आहे. या वादाने कुणाचे भले झाले? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.
पेस-भूपती-बोपण्णा यांच्याशिवाय खेळणाऱ्या भारताच्या युवा डेव्हिस चषक संघाने चंदीगढमध्ये झालेल्या लढतींमध्ये न्यूझीलंडवर ५-० असा निर्विवाद विजय मिळवला. सोमदेव देववर्मन, विष्णू वर्धन, युकी भांब्री, सनम सिंग आणि दिवीज शरण यांनी भारतीय टेनिसचा भविष्यकाळ चांगला असेल, याची खात्री चाहत्यांना दिली.
वस्त्रहरणाचे नाटय़ उलगडण्यापूर्वी यंदाच्या वर्षांतल्या काही सकारात्मक गोष्टींची नोंद घेणे आवश्यक आहे. ३८व्या वर्षीही लिएण्डर पेस हाच आपला दुहेरीतील सर्वोत्तम खेळाडू आहे, हे स्पष्ट झाले. पेसने राडेक स्टेपनेकच्या साथीने खेळताना ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयासह पेसने कारकीर्दीतील ग्रँडस्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण केले. भारतीयांसाठी हा निश्चितच अभिमानाचा क्षण होता. लाल मातीवरल्या अर्थात फ्रेंच खुल्या स्पर्धेत सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांनी मिश्र दुहेरीत जेतेपदावर मोहोर उमटवली. प्रत्येक फेरीत अव्वल प्रतिस्पध्र्याना टक्कर देत मिळवलेले हे जेतेपद त्या दोघांच्या अविरत परिश्रमाचे फलित होते. भूपती आणि बोपण्णाने याच वर्षी दोन जेतेपदांवर कब्जा केला. वर्षांच्या पूर्वाधातील चांगल्या कामगिरीमुळेच या दोघांना एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र तिथे त्यांची कामगिरी निराशाजनकच झाली. १७ वर्षीय पुणेकर टेनिसपटू ऋतुजा भोसलेची कामगिरी प्रशंसनीय अशीच ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा