ऑरलिन्स (फ्रान्स) : भारताच्या प्रियांशू राजावतने ऑरलिन्स मास्टर्स बॅडिमटन स्पर्धेतील आपली सनसनाटी आगेकूच शनिवारीही कायम राखली. आर्यलडच्या एन्हत एन्गुएनचा पराभव करून प्रियांशने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या लढतीत प्रियांशूने जागतिक क्रमवारीत ३५व्या स्थानावर असणाऱ्या एन्गुएनचे आव्हान २१-१२, २१-९ असे सहज परतवून लावले. प्रियांशू यापूर्वी भारताच्या थॉमस चषक विजेत्या संघातील खेळाडू असून, या वर्षीचा राष्ट्रीय उपविजेता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रियांशूने प्रथमच एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
नेटवरील खेळ आणि ताकदवान परतीचे फटके हे प्रियांशूच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. प्रियांशूने आपल्या परिपूर्ण खेळाने एन्गुएनच्या फोरहॅण्ड फटक्यांना शिताफीने उत्तर देत लढतीवर कमालीचे नियंत्रण राखले. प्रियांशूचे सरळ येणारे ड्राइव्ह्ज आणि क्रॉस कोर्ट फ्लिक एन्गुएनला समजलेच नाहीत. त्यामुळे एन्गुएनकडून कमालीच्या चुका झाल्या.
पहिल्या गेमला मिळालेल्या थोडय़ा फार प्रतिकारानंतरही प्रियांशूने ११-९ अशी आघाडी घेतली होती. गेमच्या मध्यानंतरही प्रियांशूने आपली आघाडी १७-११ अशी कायम राखली होती. त्यानंतर प्रियांशूने एन्गुएनला पहिल्या गेमला केवळ एक गुण मिळवून दिला. दुसऱ्या गेमला तर, प्रियांशूचा झंझावात रोखताना एन्गुएनची दमछाक झाली. कमालीच्या ताकदीने खेळत करताना प्रियांशूने ११-३ अशी मोठी आघाडी मिळवली होती. प्रियांशूच्या ताकदवान आणि वेगवान बॅकहॅण्ड फटक्यांपुढे एन्गुएन दुसऱ्या फेरीत पूर्णपणे निरुत्तर झाला होता. प्रियांशूच्या १८-३ अशा मोठय़ा आघाडीनंतर एन्गुएनला तीन मॅच पॉइंट वाचवल्याचे समाधान मिळाले. प्रियांशूने नंतर अधिक वेळ न दवडता विजयावर शिक्कामोर्तब केले.