संजय मांजरेकर यांचे मत

भारतातील अन्य रणजी क्रिकेट संघांची ताकद वाढली म्हणून सर्वात यशस्वी असलेल्या मुंबई संघाचा दबदबा कमी झाला, असे मत भारताचे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.

विक्रमी ४१ वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामातही बाद फेरी गाठण्यासाठी गटवार साखळीतील शेवटच्या लढतीची वाट पाहावी लागत आहे. क-गटात तिसऱ्या स्थानी असलेल्या मुंबईला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी शनिवारपासून खेळल्या जाणाल्या त्रिपुराविरुद्धच्या लढतीत विजय आवश्यक आहे.

‘‘यापूर्वी मुंबई आणि अन्य काही शहरांमधील संघांचे रणजी करंडक स्पर्धेवर वर्चस्व असायचे. आता छोटय़ा शहरातील क्रिकेटपटूही मुंबई आणि अन्य अव्वल संघांप्रमाणे जिगरीने खेळतात. मुंबईचा दबदबा कमी होण्यासाठी हे एक कारण आहे,’’ असे मांजरेकर म्हणाले.

मुंबईला चांगल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या नेतृत्वाची उणीव भासत आहे, असे मांजरेकर यांनी सांगितले. याबाबत ते म्हणाले, ‘‘यापूर्वी एखादा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू मुंबईचे नेतृत्व करायचा. मी संदीप पाटील यांच्या कर्णधारपदाखाली खेळलो आहे. त्याचा वेगळा संदेश क्रिकेटपटूंमध्ये जायचा. आता कुठेतरी त्याची उणीव जाणवते आहे.’’

Story img Loader