सध्या धावांची बरसात करणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्याइतपत क्षमता ऑस्ट्रेलियांच्या वेगवान गोलंदाजांमध्ये आहे. जर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपले कौशल्य आणि क्षमतेनुसार खेळ केला तर विराट कोहलीला अडचणीत आणण्याइतपत ते सक्षम आहेत, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याने सांगितले.
‘‘भारताविरुद्धच्या मालिकेविषयी जास्त भावनाविवश होऊ नका, असा सल्ला मी सहकाऱ्यांना देईन. कारण भावनेने पाहुण्यांविरुद्ध खेळलो तर सामन्यावर पकड मिळवता येणार नाही. शांतचित्ताने खेळ करून आम्हाला आमच्या रणनीतीची अंमलबजावणी करता येईल,’’ असेही त्याने सांगितले.
चेंडूत फेरफार केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघव्यवस्थापनात बरेच बदल झाले आहेत. कोहलीविषयी पेन म्हणाला, ‘‘कोहली वि. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज अशी लढत होणार असली तरी गोलंदाजांना संयमाने खेळ करावा असाच सल्ला मी देईन. यजमान खेळाडूंनी त्यांना साजेसा खेळ करावा, असे मला वाटते. जर विराटला भिडण्याचा विचार करत असाल तर तुमची कारकीर्द बरबाद होण्याची शक्यताच अधिक आहे.’’