IND vs AUS Boxing Day Test Rohit Sharma Funny Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत मेलबर्न येथे बॉक्सिग डे कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे मजेशीर संभाषण स्टंप माईकमध्ये कैद झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे पहिल्यांदाच घडलं नाही, जेव्हा जेव्हा रोहित शर्मा स्टंपच्या आसपास असतो, तेव्हा लोकांना त्याचे शब्द नेहमीच आवडतात. तो ज्या शैलीत सहकाऱ्यांशी संवाद साधतो ते चाहत्यांना प्रचंड आवडते.
आता बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या दिवशीही असंच काहीसं पाहायला मिळालं. जेव्हा रोहित शर्माने रवींद्र जडेजाला विचारलं की, फलंदाजाला कोण बाद करणार? त्यावेळी जडेजाला वेगळं क्षेत्ररक्षण हवं होतं, पण कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, त्या दिशेला बाऊंड्री लांब आहे आणि फलंदाज फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करु शकतो आणि आपल्याला त्याची विकेट मिळवू शकतो.
रोहित-जडेजाचा व्हिडीओ व्हायरल –
अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या एका षटकापूर्वी रोहित शर्मा म्हणतो, “यार, चेंडू तिकडे जाणार नाही.” तो पुढे म्हणतो, “तो इकडे बाद होईल. कारण बाऊंड्री खूप लांब आहे. यार आपल्याला त्याला बाद करायला बघायचंय. त्याला बाद कोण करणार? मी?. बघा, नाही तर मला गोलंदाजी करावी लागेल.” मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचा दुसरा दिवस भारतासाठी चांगला राहिला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात बऱ्याच धावा केल्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात तीन विकेट्स घेतल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या आहेत.
u
ऑस्ट्रेलियन संघासाठी स्टीव्हन स्मिथने दमदार शतक झळकावले, तर सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा आणि मार्नस लबूशेन यांनी अर्धशतके झळकावली. कर्णधार पॅट कमिन्सने ४९ धावा जोडल्या. भारतासाठी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराह राहिला, ज्याने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना बाद केले. रवींद्र जडेजाने सुद्धा तीन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आकाश दीपने दोन आणि वॉशिंग्टन सुंदरने एक विकेट घेतली.