सूर गवसण्यासाठी धडपडणाऱ्या रॉजर फेडरर या प्रौढ खेळाडूवर मात करीत स्पेनच्या टॉमी रॉब्रेडो याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजय नोंदविला. स्पेनच्या माजी विजेत्या रॅफेल नदाल याने अपराजित्व राखले.
या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत फेडरर व नदाल अशी लढत पहावयास मिळेल अशी अपेक्षा होती मात्र फेडरर याला त्यापूर्वीच रॉब्रेडो याने ७-६ (७-३), ६-३, ६-४ असे पराभूत केले. त्यामुळे कारकिर्दीतील सहावे अमेरिकन व एकुणातील १८ वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळविण्याचे फेडररचे स्वप्न धुळीस मिळाले. साहजिकच रॉब्रेडो याला उपांत्यपूर्व फेरीत आपल्याच देशाचा श्रेष्ठ खेळाडू नदाल याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. द्वितीय मानांकित नदाल याने २२ व्या मानांकित फिलीप कोहेलश्रेबर याचा ६-७ (४-७), ६-४, ६-३, ६-१ असा पराभव केला.
फेडरर याला यंदा ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले आहे. विम्बल्डन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतच तो पराभूत झाला होता.
स्पेनच्या डेव्हिड फेरर या चौथ्या मानांकित खेळाडूने १८ व्या मानांकित जानको टिप्सेरेव्हिक याच्यावर ७-६ (७-२), ३-६, ७-५, ७-६ (७-३) असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. फेरर याला आता फ्रान्सच्या रिचर्ड गास्केट याच्याशी खेळावे लागणार आहे. गास्केट याने दहाव्या मानांकित मिलोस राओनिक याचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पावणेपाच तास चाललेली ही लढत गास्केट याने ६-७ (४-७), ७-६ (७-४), २-६, ७-६ (११-९), ७-५ अशी जिंकली. राओनिक याने या सामन्यात ३९ बिनतोड सव्‍‌र्हिस करुनही त्याला पराभव टाळता आला नाही.
..वयाचा अडसर नाही!
महिला गटात तिशी ओलांडलेल्या पाच खेळाडूंनी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. रॉबर्टा व्हिन्सी हिने कॅमिला जॉर्जी हिला ६-४, ६-२ असे पराभूत केले तर तिची मैत्रीण फ्लेव्हिया पेनेट्टा हिने रुमानियाच्या सिमोना हॅलेप हिचा ६-२, ७-६ (७-३) असा पराभव केला. पेनेट्टाला आता व्हिन्सी हिच्याशी लढत द्यावी लागणार आहे. पेनेट्टा हिने सांगितले,की व्हिन्सी ही मला बहिणीसमान आहे. आम्ही चार वर्षे एका खोलीत राहात होतो. स्लोव्हाकियाच्या डॅनिएला हांचुकोवा हिने विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळविणाऱ्या एलिसन रॅसिकी हिच्यावर ६-३, ५-७, ६-२ असा विजय मिळविला.
मी माझाच पराभव केला – फेडरर
माझ्या खराब खेळामुळेच मी माझा पराभव ओढवून घेतला. मी जर असा यापुढेही खेळत राहिलो तर नदाल याच्यावर मात करण्याची इच्छा अपुरी राहणार आहे, असे फेडरर याने सामना संपल्यानंतर सांगितले. तो पुढे म्हणाला,‘‘या सामन्यातील खेळाबाबत मी अतिशय निराश झालो आहे. गेले काही दिवस गुडघ्याच्या दुखापतीमुळे मला ग्रासले असले तरी असा खेळ मी अपेक्षिला नव्हता.’’
भारताच्या दिजिव शरणचे आव्हान संपुष्टात
भारताच्या दिजिव शरण याचे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पुरुषांच्या दुहेरीत दिविज व त्याचा सहकारी येन हुसान लु (चीन तैपेई) यांना एहसाम उल हक कुरेशी (पाकिस्तान) व जीन ज्युलियन रॉजेर (नेदरलँड्स) यांनी ७-६ (८-६), ३-६, ६-३ असे हरविले.
सामना संपल्यानंतर शरण म्हणाला,‘‘या सामन्यात मी पराभूत झालो असलो तरी येथील अनुभव मला भावी कारकिर्दीसाठी उपयुक्त ठरणार आहे. खरंतर हा सामना आम्ही जिंकू शकलो असतो. या सामन्यात आमच्याकडून झालेल्या चुकांचा फायदा प्रतिस्पर्धी खेळाडूंना मिळाला. पुढच्या स्पर्धेत माझी कामगिरी चांगली होईल अशी मला खात्री आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत सहभागी होणे हेच एक आव्हान असते. मात्र, हे आव्हान मी पार करू शकलो यातच मला समाधान आहे. चीन तैपेईचा माझा सहकारी येन याच्याकडूनही मला भरपूर शिकावयास मिळाले.’’ 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा