अ‍ॅलेक्स ओक्साल्डे-चेम्बरलेन याने झळकवलेल्या दोन गोलांच्या जोरावर अर्सेनलने क्रिस्टल पॅलेसचा २-० असा पाडाव करीत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे पाच महिने मैदानाबाहेर असलेल्या अ‍ॅलेक्सने ४७व्या आणि ७३व्या मिनिटाला गोल करीत शानदार पुनरागमन केले.
अर्सेनलने २४ सामन्यांत ५५ गुणांसह अव्वल स्थानी मजल मारली आहे. पण सोमवारी होणाऱ्या सामन्यात मँचेस्टर सिटीने चेल्सीला हरवल्यास, सिटी पुन्हा अग्रस्थानावर पोहोचेल. दरम्यान, चौथ्या क्रमांकावरील लिव्हरपूलला वेस्ट ब्रूमविच अल्बियान संघाविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.
जेतेपदाच्या शर्यतीतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या मँचेस्टर युनायटेडला स्टोक सिटीकडून १-२ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. चार्ली अ‍ॅडमने ३८व्या मिनिटाला स्टोक सिटीला आघाडीवर आणले. त्यानंतर ४७व्या मिनिटाला रॉबिन व्हॅन पर्सीने युनायटेडला बरोबरी साधून दिली. अखेर चार्लीने ५२व्या मिनिटाला केलेला गोल स्टोक सिटीच्या विजयात निर्णायक ठरला.

Story img Loader