जलतरणपटूंना तरणतलावातील सरावासह व्यायामशाळा, आहारतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ अशा पूरक घटकांची साथ आवश्यक असते. एकाच छत्राखाली हे सर्व उपलब्ध करून देणाऱ्या अकादमी दक्षिणेकडील राज्यात असल्यामुळे महाराष्ट्राचे जलतरणपटू तिकडे रवाना होताना दिसत आहेत. अशा वेळी आपल्या मुंबईत सर्वसमावेशक अकादमीचा उपक्रम गोरेगावच्या प्रबोधन संस्थेने राबवला आहे. ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांना हा तरणतलाव पाहण्याचा योग आला. ऑलिम्पिक आकाराच्या आणि पूरक सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतील अशा यंत्रणेने ते प्रभावित झाले. जलतरणपटू घडवण्यासाठी अकादमी सुरू करण्याची कल्पना त्यांनी प्रबोधन संस्थेसमोर मांडली आणि त्यातूनच ‘ओझोन’ अकादमीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
जलतरणपटूंना स्पर्धात्मक सरावासाठी आवश्यक असा ५० मीटरचा ऑलिम्पिक आकाराचा तरणतलाव येथे उपलब्ध आहे. तरणतलावाची देखभाल ठेवण्यासाठी क्लोरिनचा सर्रास वापर होतो. मात्र त्यामुळे काही जणांना त्वचा तसेच डोळ्यांचे विकार होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी येथे ओझोन वायूद्वारे तरणतलावाची देखभाल केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता ओझोनचाच उपयोग केला जातो. मात्र मुंबईत पंचतारांकित हॉटेल्सचा अपवाद वगळता ओझोनचा उपयोग करणारी प्रबोधन ही पहिलीच संस्था आहे.
‘‘पोहण्याची अपवादात्मक कौशल्ये असणाऱ्या, परंतु आर्थिकदृष्टय़ा मागास खेळाडूंना मदतीसाठी प्रबोधन संस्था तयार आहे ‘‘,असे या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक सुनील वेलणकर यांनी सांगितले. ‘‘खेळाडूंना नीट मार्गदर्शन करता यावे यासाठी एकूण विद्यार्थ्यांची संख्या २०पेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. आमच्या उपक्रमाला प्रायोजकांची साथ मिळाली तर या उपक्रमाला बळकटी मिळेल,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
क्लोरिनऐवजी ओझोन
जलतरणाच्या देखभालीसाठी क्लोरिनऐवजी ओझोनचा उपयोग. क्लोरिनमुळे त्वचा आणि डोळ्यांच्या विकाराची शक्यता. ओझोनचा उपयोग केल्यामुळे हे दुष्परिणाम नाहीत.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
अव्वल जलतरणपटू आणि अनेक जलतरणपटूंना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अर्जुन पुरस्कारप्राप्त स्मिता देसाई-दिवगीकर मुख्य प्रशिक्षक. मानसिकदृष्टय़ा कणखर होण्यासाठी ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन.
आहार-विहार
कायम तंदुरुस्त राहण्याकरता जलतरणाबरोबर शारीरिक व्यायाम तसेच आहाराच्या नियोजनासाठी ‘तळवलकर्स’च्या माध्यमातून मार्गदर्शन आणि वर्कआऊटसाठी संधी.
खुल्या मैदानातला सराव
जलतरणाच्या सरावाआधी आणि नंतर शरीराची काळजी घेणारा खुल्या मैदानातील सराव मार्गदर्शकांच्या निरीक्षणाखाली.
कोणाला आणि कसा मिळेल प्रवेश
मुख्य प्रशिक्षक स्मिता देसाई-दिवगीकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या चाचणीद्वारे गुणवत्ता आधारावर प्रवेश. अकादमीत विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित त्यामुळे प्रवेशासाठी तीव्र चुरस. ९ ते १० वयोगटात असणाऱ्या मुलांना प्रवेशाची संधी.
प्रवेश शुल्क
दर महिन्यासाठी २,५०० रुपये शुल्क. यामध्ये कोणत्याही छुप्या शुल्काचा समावेश नाही. मात्र वैयक्तिक समुपदेशन हवे असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार .
सरावाची वेळ
शाळेच्या वेळा सांभाळून सरावाचे आयोजन. सकाळी ५.३० ते ७ या वेळेत आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळात सराव चालतो.