जलतरणपटूंना तरणतलावातील सरावासह व्यायामशाळा, आहारतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ अशा पूरक घटकांची साथ आवश्यक असते. एकाच छत्राखाली हे सर्व उपलब्ध करून देणाऱ्या अकादमी दक्षिणेकडील राज्यात असल्यामुळे महाराष्ट्राचे जलतरणपटू तिकडे रवाना होताना दिसत आहेत. अशा वेळी आपल्या मुंबईत सर्वसमावेशक अकादमीचा उपक्रम गोरेगावच्या प्रबोधन संस्थेने राबवला आहे. ज्येष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांना हा तरणतलाव पाहण्याचा योग आला. ऑलिम्पिक आकाराच्या आणि पूरक सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकतील अशा यंत्रणेने ते प्रभावित झाले. जलतरणपटू घडवण्यासाठी अकादमी सुरू करण्याची कल्पना त्यांनी प्रबोधन संस्थेसमोर मांडली आणि त्यातूनच ‘ओझोन’ अकादमीची मुहूर्तमेढ रोवली गेली.
जलतरणपटूंना स्पर्धात्मक सरावासाठी आवश्यक असा ५० मीटरचा ऑलिम्पिक आकाराचा तरणतलाव येथे उपलब्ध आहे. तरणतलावाची देखभाल ठेवण्यासाठी क्लोरिनचा सर्रास वापर होतो. मात्र त्यामुळे काही जणांना त्वचा तसेच डोळ्यांचे विकार होतात. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी येथे ओझोन वायूद्वारे तरणतलावाची देखभाल केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता ओझोनचाच उपयोग केला जातो. मात्र मुंबईत पंचतारांकित हॉटेल्सचा अपवाद वगळता ओझोनचा उपयोग करणारी प्रबोधन ही पहिलीच संस्था आहे.
‘‘पोहण्याची अपवादात्मक कौशल्ये असणाऱ्या, परंतु आर्थिकदृष्टय़ा मागास खेळाडूंना मदतीसाठी प्रबोधन संस्था तयार आहे ‘‘,असे या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक सुनील वेलणकर यांनी सांगितले. ‘‘खेळाडूंना नीट मार्गदर्शन करता यावे यासाठी एकूण विद्यार्थ्यांची संख्या २०पेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. आमच्या उपक्रमाला प्रायोजकांची साथ मिळाली तर या उपक्रमाला बळकटी मिळेल,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा