प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद, सय्यद मोदी यांच्यानंतर जागतिक बॅडमिंटन स्तरावर पुरुष गटात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे चित्र होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत पारुपल्ली कश्यपने ही पोकळी भरून काढण्याचा आत्मविश्वास दिला. मात्र यानंतर खराब फॉर्म आणि दुखापतींनी त्याला सतावले. परंतु जिद्दीने वाटचाल करीत कश्यपने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरीत सुवर्णपदकावर कब्जा केला. तब्बल ३२ वर्षांनंतर या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला रौप्यपदकावर, तर आरएमव्ही गुरुसाईदत्तला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या कश्यपने अटीतटीच्या अंतिम लढतीत सिंगापूरच्या डेरेक वोंगवर २१-१४, ११-२१, २१-१९ असा विजय मिळवला. या विजयासह राष्ट्रकुलमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक विजेत्या प्रकाश पदुकोण आणि सय्यद मोदी यांच्या पंक्तीत कश्यपने स्थान पटकावले
आहे.
पदुकोण यांनी १९७८ साली पहिल्यांदा सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर १९८२ साली मोदी यांनी सुवर्णपदक कायम राखले. मात्र यानंतर तब्बल ३२ वर्षे भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची प्रतीक्षा करावी लागली.
कोर्टवरचा वावर आणि कलात्मक खेळासाठी प्रसिद्ध वोंगविरुद्ध कश्यपने १४-८ अशी आघाडी घेतली. ही आघाडी १८-१२ अशी वाढवत त्याने आगेकूच केली. दुसऱ्या गेममध्ये कश्यपच्या हातून झालेल्या चुकांचा फायदा उठवत वोंगने सरशी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दमदार स्मॅशेस, शैलीदार फटके आणि कोर्टवरच्या सर्वागीण वावराच्या बळावर कश्यपने ११-८ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. वोंगने १४-१४ अशी बरोबरी केली. मात्र यानंतर कश्यपने खेळ उंचावत १९-१६ अशी आगेकूच करीत तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
महिला दुहेरीत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीला सुवर्णपदक कायम राखता आले नाही. मलेशियाच्या व्हिव्हिअन काह मून हू आणि खे वेई मून जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीवर २१-१७, २१-१३ अशी मात केली.
आरएमव्ही गुरुसाईदत्तने कांस्यपदकावर नाव कोरले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या गुरुसाईदत्तने संघर्षपूर्ण लढतीत इंग्लंडच्या राजीव ओयूसेपवर २१-१५, १४-२१, २१-१९ असा विजय मिळवला.

अ‍ॅथलेटिक्स : अरपिंदरला कांस्य
अरपिंदर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स प्रकारात भारताला तिसरे कांस्यपदक मिळवून दिले. पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात अरपिंदरने कांस्यपदक पटकावले. अरपिंदरने १६.३३ मीटर उडीसह पदकावर नाव कोरले. २१ वर्षीय अरपिंदरने पाचपैकी पहिल्या प्रयत्नात सर्वोत्तम प्रदर्शनाची नोंद केली. पुढच्या प्रयत्नांमध्ये तो ही कामगिरी सुधारू शकला नाही. १६.४६, १६.३१, १६.०९ अशी नोंद त्याने केली. त्याचे शेवटचे दोन प्रयत्न अवैध ठरवण्यात आले. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात विपिन कसाना आणि रविंदर सिंग खैरा यांना प्राथमिक फेरीही ओलांडता आली नाही. महिलांच्या १६०० मीटर रिले प्रकारात एम.आर. पुवम्मा, टिंटू लुका, रत्तनदीप कौर आणि अनिलडा थॉमस यांना अंतिम फेरीत अपात्र ठरवण्यात आले.

पॉवरलिफ्टिंग : राजिंदर राहेलूला रौप्य
पॉवरलिफ्टर राजिंदर राहेलूने हेवीवेट प्रकारात रौप्यपदक पटकावले. राहेलूने एकूण १८०.५ किलो वजन उचलत रौप्यपदकावर नाव कोरले. पॅरा पॉवरलिफ्टिंग्च्या लाईटवेट गटामध्ये रविवारी सकिना खातूनने कांस्यपदक पटकावले होते. रजिंदरचे पॅरा पॅकारातील हे दुसरे पदक आहे.

हॉकी : भारताला रौप्यपदक
राष्ट्रीय खेळ असूनही दिवसेंदिवस स्पर्धागणिक कामगिरी खालावलेल्या भारतीय हॉकी संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाला सन्मानजनक कामगिरी केली. अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने भारतावर ४-० अशी मात करीत सुवर्णपदक पटकावले. ऑस्ट्रेलियाचे हे सलग पाचवे सुवर्णपदक आहे. न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवीत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा ८-० असा धुव्वा उडवला होता. या पराभवाचा बदला घेण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी होती. मात्र बलाढय़ ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियातर्फे ख्रिस सिरिइलोने गोलची हॅट्ट्रिक नोंदवली, तर इडी ओकडेनने एक गोल केला. सिरिइलोने १३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. काही मिनिटांतच सिरिइलोने आणखी एका पेनल्टीद्वारे ऑस्ट्रेलियाच्या आघाडीत भर घातली. ४८ व्या मिनिटाला सिरिइलोने गोलची हॅट्ट्रिक नोंदवली. तीनच मिनिटांत ओकडेनने गोल करीत ऑस्ट्रेलियाला भक्कम आघाडी मिळवून दिली. निलंबनाच्या कारवाईनंतर पुनरागमन झालेला कर्णधार सरदारा सिंग, व्ही.आर. रघुनाथ गोल करण्यात अपयशी ठरले.                               

 

Story img Loader