प्रकाश पदुकोण, पुल्लेला गोपीचंद, सय्यद मोदी यांच्यानंतर जागतिक बॅडमिंटन स्तरावर पुरुष गटात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे चित्र होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत पारुपल्ली कश्यपने ही पोकळी भरून काढण्याचा आत्मविश्वास दिला. मात्र यानंतर खराब फॉर्म आणि दुखापतींनी त्याला सतावले. परंतु जिद्दीने वाटचाल करीत कश्यपने राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष एकेरीत सुवर्णपदकावर कब्जा केला. तब्बल ३२ वर्षांनंतर या स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला रौप्यपदकावर, तर आरएमव्ही गुरुसाईदत्तला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या कश्यपने अटीतटीच्या अंतिम लढतीत सिंगापूरच्या डेरेक वोंगवर २१-१४, ११-२१, २१-१९ असा विजय मिळवला. या विजयासह राष्ट्रकुलमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक विजेत्या प्रकाश पदुकोण आणि सय्यद मोदी यांच्या पंक्तीत कश्यपने स्थान पटकावले
आहे.
पदुकोण यांनी १९७८ साली पहिल्यांदा सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर १९८२ साली मोदी यांनी सुवर्णपदक कायम राखले. मात्र यानंतर तब्बल ३२ वर्षे भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची प्रतीक्षा करावी लागली.
कोर्टवरचा वावर आणि कलात्मक खेळासाठी प्रसिद्ध वोंगविरुद्ध कश्यपने १४-८ अशी आघाडी घेतली. ही आघाडी १८-१२ अशी वाढवत त्याने आगेकूच केली. दुसऱ्या गेममध्ये कश्यपच्या हातून झालेल्या चुकांचा फायदा उठवत वोंगने सरशी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दमदार स्मॅशेस, शैलीदार फटके आणि कोर्टवरच्या सर्वागीण वावराच्या बळावर कश्यपने ११-८ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. वोंगने १४-१४ अशी बरोबरी केली. मात्र यानंतर कश्यपने खेळ उंचावत १९-१६ अशी आगेकूच करीत तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
महिला दुहेरीत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीला सुवर्णपदक कायम राखता आले नाही. मलेशियाच्या व्हिव्हिअन काह मून हू आणि खे वेई मून जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीवर २१-१७, २१-१३ अशी मात केली.
आरएमव्ही गुरुसाईदत्तने कांस्यपदकावर नाव कोरले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या गुरुसाईदत्तने संघर्षपूर्ण लढतीत इंग्लंडच्या राजीव ओयूसेपवर २१-१५, १४-२१, २१-१९ असा विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा