श्रीकांत, जयराम व प्रणॉय पराभूत
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी बॅडमिंटनपटूंमध्ये चुरस तीव्र होऊ लागली आहे. युवा पी.व्ही. सिंधूही या शर्यतीत आहे. मात्र सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच्या लढतीत सिंधूला विजयासाठी संघर्ष करावा लागला. प्रणव चोप्राने पुरुष आणि मिश्र दुहेरीत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. मात्र किदम्बी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय, अजय जयराम यांना सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला.
सिंधूने थायलंडच्या बुसनान ओंगबुमरुंगफानवर ९-२१, २१-१७, २१-१७ असा विजय मिळवला. पुढच्या लढतीत सिंधूची लढत चीनच्या ही बिंगजिओशी होणार आहे. पहिल्या गेममध्ये बुसनानच्या झंझावती खेळापुढे सिंधू निष्प्रभ ठरली. दुसऱ्या गेममध्ये मात्र सिंधूने लौकिकाला साजेसा खेळ करताना बुसनानवर वर्चस्व गाजवले. दमदार स्मॅशेस, नेटजवळून सुरेख खेळ आणि सर्वागीण वावराच्या बळावर सिंधूने दुसरा गेम नावावर केला. तिसऱ्या आणि अंतिम गेममध्ये सिंधू आणि बुसनान यांच्यात एकेका गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. मात्र टिच्चून खेळ करताना सिंधूने सातत्याने आघाडी वाढवत बाजी मारली.
राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणाऱ्या प्रणवने सिक्की रेड्डीच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरीत इंडोनेशियाच्या इरफान फाधिलाह व विनी अंग्रीनी यांचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला. पुरुष दुहेरीच्या लढतीत प्रणव आणि अक्षय देवलकर जोडीने चीनच्या लियू चेंग आणि ल्यु का जोडीवर २१-१७, १६-२१, २२-२० असा विजय मिळवला.
भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंसाठी बुधवारचा दिवस निराशाजनक ठरला. अव्वल मानांकित चेन लाँगने एच.एस. प्रणॉयवर १८-२१, २१-१८, २१-१९ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत २८ व्या स्थानावर असलेल्या हेसु जेन होआने श्रीकांत याचा ११-२१, २१-१८, २१-१८ असा पराभव केला. मार्क झ्वाइबलरने २१-१७, २१-१६ अजय जयरामला असे नमवले.
दक्षिण कोरियाच्या गो अहारो व युओ हेई वोन यांनी ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला २१-१८, २१-१६ असे नमवले. जपानच्या शिझुका मात्सुओ व मामी नैतो जोडीने सिक्की रेड्डी आणि इंडोनेशियाच्या पिआ झेबादिहा बर्नाडेथ जोडीवर २१-७, २१-६ असा धुव्वा उडविला.