लखनऊ : यजमान भारताच्या आशा केंद्रित असलेल्या पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी बुधवारी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. या स्पर्धेसाठी दोघांनाही अग्रमानांकन लाभले आहे.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सिंधूने भारताचीच युवा खेळाडू अनमोल खरबचा २१-१७, २१-१५ असा पराभव केला. पुरुषांत लक्ष्यने पात्रता फेरीतून आलेल्या मलेशियाच्या शोलेह एडिलवर २१-१२, २१-१२ अशी मात केली.
सिंधूची दुसऱ्या फेरीत पुन्हा एकदा भारताच्याच इरा शर्माशी गाठ पडणार आहे. इराने पहिल्या फेरीत भारताच्या दीपशिखा सिंगवर २१-१३, २१-१९ असा विजय मिळवला.
‘‘दोन वर्षांनंतर येथे खेळताना मला आनंद होत आहे. दुखापतीमुळे मी गेल्या वर्षी या स्पर्धेत खेळू शकले नव्हते. पुन्हा घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना वेगळाच उत्साह वाटत आहे,’’ असे सिंधूने सांगितले. ‘‘आशियाई सांघिक स्पर्धेत अनमोल माझी संघ-सहकारी होती. ती चांगली खेळाडू आहे. माझ्याकडून काही चुका झाल्या, पण पुढील लढतीत त्या सुधारण्याकडे माझा कल राहील,’’ असेही सिंधूने सांगितले.
पुरुष एकेरीत तिसरा मानांकित किरण जॉर्ज, आठवा मानांकित आयुष शेट्टी आणि मीराबा लुवांग मैस्नाम या भारतीय खेळाडूंनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत द्वितीय मानांकित मालविका बनसोड, अनुपमा उपाध्याय, ईशारानी बरुआ, देविका सिहाग, उन्नती हुडा, यांनीही आगेकूच केली.