मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com

जागतिक बॅडमिंटन विजेतेपदाच्या लढतीत पी. व्ही. सिंधूला पराभव स्वीकारावा लागला. तरीही तिने घेतलेली झेप साऱ्या भारतीयांची मने जिंकणारीच आहे. चीन, जपान, स्पेनच्या खेळाडूंचे प्राबल्य असलेल्या या खेळात दुसऱ्यांदा जागतिक उपविजेतेपद मिळविणे ही काही सोपी गोष्ट नाही.

नानजिंग येथे नुकतीच जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बॅडमिंटन क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत भारताला एकमेव पदक मिळवून दिले ते सिंधू हिने. तरीही या स्पर्धेत भारताच्या अन्य खेळाडूंनी केलेली कामगिरीही समाधानकारकच ठरली. सायना नेहवाल हिला उपांत्यपूर्व फेरीतच कॅरोलीन मरीन हिने सपशेल निष्प्रभ केले तरीही खेळाच्या दृष्टीने सायनाचे वाढते वय लक्षात घेता तिची ही मजलदेखील कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सिंधूवर मात करीत सोनेरी कामगिरी केली होती. तसेच भारताला सांघिक विभागात ऐतिहासिक विजेतेपदही मिळवून देण्यात तिने महत्त्वाचा वाटा उचलला होता. अर्थात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धा यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. जागतिक स्पर्धेत प्रामुख्याने चीन, जपान, स्पेन आदी देशांचे खडतर आव्हान असते. त्यातही रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेनंतर सायना हिला मोठय़ा दुखापतीस सामोरे जावे लागले होते. काही महिने तिला स्पर्धात्मक सरावापासून वंचित राहावे लागले होते. हे लक्षात घेतले तर ती अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये खेळत आहे आणि तेही पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळवीत आहे ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

सायनापेक्षाही सिंधूच्या कामगिरीकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या. सिंधू हिने रिओ येथील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळवीत अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळविला होता. प्रकाश पदुकोण व पुल्लेला गोपीचंद यांनी बॅडमिंटन क्षेत्रात ऑल इंग्लंड ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली आहे. त्यांच्या या कामगिरीनंतर अपेक्षेइतके बॅडमिंटन युग आपल्या देशात निर्माण झाले नाही. अर्थात त्यांच्या वेळी फारशा सुविधा व सवलती नव्हत्या. तसेच क्रीडा क्षेत्राविषयीही देशात फारशी आपुलकी नव्हती. त्यामुळेच त्यांना जे शक्य झाले नाही, ते सायनाने आपल्या कामगिरीमुळे काही अंशी निर्माण केले. तिने बॅडमिंटन युगाचा पाया रचला व सिंधूने ऑलिम्पिक रौप्यपदकासह त्याचा कळस गाठला. रिओ ऑलिम्पिकच्या वेळची तिची अंतिम लढत कोटय़वधी भारतीयांच्या नजरेतून सुटली नाही. या पदकामुळे सिंधू घराघरात पोहोचली. अर्थात जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविण्यात ती अजूनही कमी पडत आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धा असो किंवा गतवेळची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा असो, या दोन्ही स्पर्धामध्ये तिला विजेतेपदाच्या उंबरठय़ावरून पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या दोन वर्षांमध्ये तिला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह आठ दहा स्पर्धामध्ये अजिंक्यपदाने हुलकावणी दिली आहे. ऑलिम्पिक तसंच गतवेळच्या जागतिक स्पर्धेत आघाडीवर असताना तिला हाराकिरीस सामोरे जावे लागले होते. कॅरोलीन मरीन किंवा नोझोमी ओकुहारा यांच्या खेळाशी तुलना केल्यास सिंधू अंतिम लढतीत खूप मानसिक दडपण घेते. तिची देहबोली विजेतेपदासाठी तयार नसते. खरंतर आपल्या उंचीचा फायदा घेत तिने आक्रमक स्मॅशिंग व ड्रॉपशॉट्स मारण्याची आवश्यकता आहे. तशी शैली तिच्या खेळात दिसत नाही. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर नैराश्य असणे हे तिच्यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूकडून अपेक्षित नाही. त्याचप्रमाणे आपल्या पाठीमागे पडणाऱ्या फटक्यांचा अंदाज घेतानाही ती चुकते. अनेक मातब्बर खेळाडू घडविणाऱ्या पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत असते. आज शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्तीबाबतही मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ असतात. गोपीचंद यांच्या अकादमीतही असे तज्ज्ञ आहेत. विजेतेपद मिळविण्यात सिंधू कोठे कमी पडते, उंचीचा फायदा तिला आक्रमक खेळासाठी कसा करता येईल याचा अभ्यास त्यांनी केला पाहिजे व त्यानुसार तिच्या खेळात सुधारणा घडविण्याची गरज आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रतिस्पर्धी खेळाडू सव्‍‌र्हिस करीत असताना सिंधूचे लक्ष नसते. जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत याबाबत पंचांनी तिला ताकीदही दिली होती. या गोष्टी तिने टाळल्या पाहिजेत. जेणेकरून आपण केलेल्या चुकांमुळे खेळावर व मानसिकतेवर अनिष्ट परिणाम होणार नाही याची काळजी सिंधूने घेतली पाहिजे. तिच्याकडून चाहत्यांना अजून भरपूर यशाची अपेक्षा आहे.

सिंधू व सायनाप्रमाणेच किदम्बी श्रीकांत, बी.साईप्रणीत, एच. एस. प्रणॉय या खेळाडूंनीही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुपरसिरीजमध्ये अव्वल कामगिरी केली आहे. मात्र ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धामध्ये सर्वोच्च यश मिळविताना ते कमी पडतात. त्याचप्रमाणे मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा व सात्त्विकसाईराज रान्किरेड्डी, महिला दुहेरीत अश्विनी व एन.सिक्की रेड्डी, पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी व सात्त्विकसाईराज या खेळाडूंनीही गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक स्पर्धामध्ये पदकांची कमाई केली आहे. जागतिक स्पर्धेतही अशी कामगिरी करण्यासाठी त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आपण कोठे कमी पडतो याचा अभ्यास करीत त्यानुसार नियोजनपूर्वक सरावावर भर दिला पाहिजे. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये बॅडमिंटनपटूंना भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. आपल्या देशात उबेर व थॉमस चषक स्पर्धासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले जात असते. आयपीएलसारखी व्यावसायिक लीगही आता आपल्या देशात बॅडमिंटन संघटकांनी सुरू केली आहे. त्यामध्ये परदेशी खेळाडूंचाही भरपूर सहभाग असतो. परदेशातील अनेक स्पर्धामध्ये आपले खेळाडू खेळत असतात. या स्पर्धामध्ये आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या खेळाडूंची शैली आपल्याला कशी आत्मसात करता येईल याचा विचार त्यांनी करण्याची गरज आहे. बॅडमिंटन या खेळाचा जन्म पुण्यात झाला आहे. आपल्या मातीत जन्म झालेल्या या खेळात भारताची हुकमत कशी निर्माण होईल याचा खेळाडू, पालक, प्रशिक्षक व संघटकांनी एकत्रितपणे विचार केला पाहिजे तरच भारताला या खेळात सुवर्णयुग निर्माण करता येईल.
सौजन्य – लोकप्रभा

Story img Loader