माजी विजेते पी.व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी शानदार खेळाचे प्रदर्शन करीत येथे सुरू असलेल्या चायना ओपन विश्व सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीतील पहिल्या आठ खेळाडूमधील आपले स्थान निश्चित केले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरंगफानचे आव्हान सरळ दोन गेम्समध्ये २१—१२, २१—१५ असे परतवून लावले, तर श्रीकांतने पुरुष एकेरीत तीन गेम रंगलेल्या लढतीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तला बाहेरचा रस्ता दाखवताना १०—२१, २१—९, २१—९ असा विजय संपादन केला. श्रीकांतने हा सामना ४५ मिनिटात जिंकला. २०१४ मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीकांतचा पुढील सामना चिनी तैपेईच्या चोउ टियेन चेनशी होणार आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या रँकिंगवर असलेल्या श्रीकांतला गेल्या तीन वर्षांत चेनकडून दोनदा हार पत्करावी लागली होती. तिसऱ्या सीडेड सिंधूचा पुढील सामना आठव्या सीडेड बिंगजियाओशी होणार आहे. या सामन्यात सिंधूला तिच्याकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.