ऑलिम्पिक वर्षांत दमदार प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने उतरलेल्या भारतीय बॅडमिंटनपटूंचे आव्हान जर्मन ग्रां.प्रि. स्पर्धेत झटपट संपुष्टात आले. सायनाच्या अनुपस्थितीत महिला गटात भारताचे नेतृत्त्व करणारी पी. व्ही. सिंधूसह किदम्बी श्रीकांत आणि पारुपल्ली कश्यप यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

चौथ्या मानांकित चीनच्या सिझियान वांगने सातव्या मानांकित सिंधूवर २१-१६, २१-१८ असा विजय मिळवला.गुडघ्याच्या दुखापतीने उचल खाल्ल्याने कश्यपने माघार घेतली. दुखापतींच्या ससेमिऱ्याला तोंड देत कश्यपने पुनरामगन केले. मात्र गेल्या वर्षीचा फॉर्म त्याला कायम राखता आलेला नाही. रिओ ऑलिम्पिकसाठी स्पर्धा तीव्र झालेली असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी सुधारणे कश्यपसाठी आवश्यक होते. मात्र दुखापतीमुळे कश्यपचे आव्हान कमकुवत झाले आहे. जागतिक क्रमवारीत कश्यपची १७व्या स्थानी घसरण झाली आहे. पोटरीचे स्नायू आणि त्यानंतर पोटाच्या दुखापतीने कश्यपला वारंवार सतावले आहे. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कश्यपची निवड झाली होती. मात्र दुखापतीच्या कारणास्तव कश्यपने या स्पर्धेतून माघार घेतली. तंदुरुस्त होण्यासाठी कश्यपने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतूनही माघार घेतली होती. जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या किदम्बी श्रीकांतचेही आव्हान संपुष्टात आले. हाँगकाँगच्या एनजी का लाँग अँगसने श्रीकांतवर २१-१८, १८-२१, २१-१८ अशी मात केली.

Story img Loader