४ एप्रिलपासून ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे रंगणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाचं नेतृत्व बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूकडे देण्यात आलेलं आहे. सुरुवातीच्या दिवशी रंगणाऱ्या स्वागत सोहळ्यात सिंधू पथसंचलनात भारतीय पथकाचं नेतृत्व करणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने यासंदर्भातली अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या वर्षभरातील सिंधूची जागतिक बॅडमिंटनमधील कामगिरी पाहता ऑलिम्पिक संघटनेने सायना नेहवाल, मेरी कोम यांसारख्या सिनीअर खेळाडूंना वगळून सिंधूला हा बहुमान दिला आहे.

सायना नेहवाल आणि मेरी कोम यांची ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत भारतीय पथकाचं नेतृत्व करण्याचा बहुमान मिळालेला नव्हता. गेल्या वर्षभरात सिंधूने आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलेला खेळ पाहता, आगामी राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही तिच्याकडून पदकाची आशा व्यक्त केली जात आहे. पथसंचलनासाठी भारतीय पथकाचं नेतृत्व करण्यासाठी सिंधूची झालेली निवड ही तिच्या कामगिरीच्या आधारावर झाली असल्याचं, ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.