मकाऊ स्पध्रेत हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या पी. व्ही. सिंधूचे लक्ष्य
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला पायाच्या दुखापतीमुळे अनेक स्पर्धामधून माघार घ्यावी लागली. मात्र डेन्मार्क सुपर सीरिज प्रीमियर स्पध्रेतील दमदार पुनरागमन व मकाऊ खुल्या स्पध्रेतील जेतेपदाच्या हॅट्ट्रिकमुळे सिंधू भलतीच खुशीत आहे. त्यामुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशियन मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेचे जेतेपद पटकावण्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे. ‘‘इंडोनेशियन मास्टर्स स्पध्रेचे जेतेपद, हे माझे पुढील लक्ष्य आहे,’’ असे सिंधूने सांगितले.
विश्व अजिंक्यपद स्पध्रेची दोन कांस्यपदके नावावर असलेल्या सिंधूने डेन्मार्क खुली स्पर्धा या कारकीर्दीतील पहिल्याच सुपर सीरिज स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर मकाऊ खुली स्पर्धा जिंकणारी सिंधू म्हणाली, ‘‘मकाऊ स्पध्रेतील सर्वागीण कामगिरी समाधानकारक होती. मितानी चांगली खेळाडू आहे. जपान खुल्या स्पध्रेत तिच्याकडून मला पराभव पत्करावा लागला होता. तिच्यावर विजय मिळवल्याचा आनंदच आहे.’’
‘‘जानेवारी २०१६मध्ये इंडियन बॅडमिंटन लीगपासून सत्राची सुरुवात करणार आहे. त्यानंतर सय्यद मोदी, इंडियन खुली, आदी अनेक स्पर्धा आहेतच. ऑलिम्पिक वर्ष असल्याने प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची आहे. खेळात सुधारणा करून चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होईन,’’ अशी आशा सिंधूने प्रकट केली.
सिंधूला दहा लाखांचे बक्षीस
मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पध्रेत जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी करणाऱ्या सिंधूला भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडून दहा लाखांचे बक्षीस जाहीर झाले.
सिंधू, श्रीकांतवर भारताची मदार
इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेच्या पहिल्याच फेरीत सिंधूसमोर इंडोनेशियाच्या ग्रेगोरिआ मॅरिस्काचे आव्हान असणार आहे. या स्पध्रेत सिंधूसह भारताची मदार अव्वल मानांकित किदम्बी श्रीकांत याच्यावर असणार आहे. सलग दुसऱ्यांदा बीडब्लूएफ सुपर सीरिज अंतिम स्पध्रेकरिता पात्र ठरलेल्या श्रीकांतला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या विबोवो सेत्याल्डी पुत्राशी सामना करावा लागेल. तिसऱ्या मानांकित एच. एस. प्रणॉयसमोर इंडोनेशियाच्या पंजी अहमद मौलाना, तर आर.एम.व्ही. गुरुसाईदत्तसमोर मुहम्मद अहदीअल ओक्टा खरुल्लोहचे आव्हान आहे.