क्वालालंपूर : भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत (सुपर ५०० दर्जा) बुधवारी विजयी सलामी दिली.जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असणाऱ्या सिंधूने स्कॉटलंडच्या ख्रिास्टी गिलमोरला २१-१७, २१-१६ असे सरळ गेममध्ये नमवत महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. आता सिंधूसमोर कोरियाच्या सिम यू जिनचे आव्हान असेल.
अन्य सामन्यात भारताच्या अश्मिता चलिहाने चायनीज तैपेइच्या लिन सिह युनवर २१-१७, २१-१६ असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जने जपानच्या ताकुमा ओबायाशीला २१-१६, २१-१७ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत जागतिक क्रमवारीत ५३व्या स्थानी असणाऱ्या बी. सुमीत रेड्डी आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या हाँगकाँगच्या लुइ चुन वाइ आणि फु चि यान जोडीला २१-१५, १२-२१, २१-१७ असे नमवत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले. पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या कृष्ण प्रसाद गारगा आणि साई प्रतीक जोडीने मिंग चेन लू व टँग काइ वेई जोडीला २३-२१, २१-११ असे नमवले.