Neeraj Chopra Sets New National Record: ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एका नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स २०२२ (Paavo Nurmi Games 2022) मध्ये नीरजने ८९.३० मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केलाय. यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होते. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पतियालामध्ये ८८.०७ मीटर दूर भाला फेकला होता. ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावलं होतं. या कामगिरीमुळे नीरज हा अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरलेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून त्याने यामध्ये रौप्य पदकाची कमाई केलीय. या स्पर्धेमध्ये फिनलॅण्डच्या ऑलिव्हर हीलॅण्डरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने ८९.८३ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. नीरजच्या कामगिरीशी तुलना केल्यास सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेल्या ऑलिव्हरने ०.५३ मीटरच्या अंतराच्या फरकाने पहिला क्रमांक पटकावला.

टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा जवळपास १० महिने स्पर्धांपासून दूर होता. एवढ्या मोठ्या विश्रांतीनंतर नीरज आता पुन्हा मैदानावर उतरला असून त्याने जवळजवळ ९० मीटरपर्यंत भालाफेक करत दमदार कामगिरी केलीय. नीरज चोप्रा हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून नीरज फॉर्ममध्ये परत आल्याने आता त्याच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेनंतर नीरज फिनलॅण्डमधील कुओर्तने गेम्समध्ये भाग घेणार आहे. त्यानंतर तो डायमंड लीगच्या स्टॉकहोम लेगसाठी स्वीडनला रवाना होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paavo nurmi games 2022 neeraj chopra sets new national record with 89 point 30 metres javelin throw scsg