टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी समाजमाध्यमांवरून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला लक्ष्य केले. मात्र, भारताच्या अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी, तसेच सर्वसामान्य क्रिकेट रसिकांनीही भारताच्या या गुणी गोलंदाजाची एकदिलाने पाठराखण केली. या संपूर्ण प्रकरणानंतर शमी पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झाला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारताला आता रविवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचे आहे.

या सामन्यापूर्वी मोहम्मद शमी सरावात परतला. शमीने सोशल मीडियावर त्याचा ट्रेनिंग फोटो शेअर करत लिहिले, ”ट्रेनिंगवर परतलो. उत्तम प्रशिक्षण सत्र झाले आणि आमच्या युवा प्रतिभावान क्रिकेटपटूंशी संवाद साधताना आनंद झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रित केले आहे.” शमीने टीकाकारांना कोणतेही उत्तर न देता आपल्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे.

हेही वाचा – किती गोड..! दिनेश कार्तिक बनला जुळ्या मुलांचा बाप; ‘खास’ नावांनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

दुबई येथे रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून मानहानिकारक पराभव केला. या लढतीत शमीने ३.५ षटकांत ४३ धावा दिल्या. त्यामुळे काही जल्पकांनी त्याच्या धर्माकडे बोट दाखवून जाणूनबुजून अशी कामगिरी केल्याचा आरोप केला. काहींनी तर थेट पाकिस्तानकडून खेळण्याचे सल्ले देतानाच त्याला देशद्रोही असे संबोधले.

Story img Loader