पत्नी रिया पिलाई हिने केलेले आरोप खोडसाळपणाचे आहेत व आपण या मोसमात विम्बल्डन व अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धामध्ये सहभागी होणार आहोत, असे भारताचा डेव्हिससपटू लिअँडर पेस याने येथे सांगितले.
आपल्याला पेस याने घरात येऊ दिले नाही अशी तक्रार रिया हिने येथील बांद्रा पोलिसांकडे केली आहे. रिया ही पेस हाउसमध्ये वास्तव्यास आहे. तिने केलेल्या आरोपांचे खंडन करीत पेस याने एका पत्रकात म्हटले आहे, की रियाने माझ्याविरुद्ध हे कुंभाड रचले असून मला बदनाम करण्याचाच त्यामागे हेतू आहे. माझ्या मुलीच्या पालकत्वासाठी मी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. त्या संदर्भात सर्व कागदपत्रे मी व माझ्या वकिलांनी दिली आहेत. या अर्जाचा निकाल माझ्या बाजूने लागेल अशी मला आशा आहे.
पेसने पुढे म्हटले आहे, की आयना ही माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व आहे. तिला चांगले पालकत्व मिळावे व तिला योग्य संरक्षण मिळावे यासाठीच मी न्यायालयात धाव घेतली आहे. तिच्यासाठी मी टेनिस देखील सोडण्यास तयार आहे. तथापि, रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत सातव्यांदा ऑलिम्पिकचे प्रतिनिधित्व करण्याची माझी इच्छा आहे, त्यामुळे सध्यातरी मी खेळावर लक्ष केंद्रित केले आहे. रिया ही आपल्या मुलीचे योग्य रीतीने पालन करण्यास असमर्थ असल्याने आयना हिचा ताबा आपल्याला मिळावा, असा अर्ज पेस याने कौटुंबिक न्यायालयात नुकताच अर्ज केला आहे.

Story img Loader