आशिया चषक २०२२ च्या चौथ्या फेरीत अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. दुबईतील शारजाह क्रिकेट स्टेडियमवरती ही लढत होत आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अफगाणिस्ताने पाकिस्तानला १२० चेंडूत १३० धावांचे आव्हान दिलं आहे.
सुरूवातील अफागाणिस्तानकडून हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज फलंदाजीसाठी मैदानात आले होते. हजरतुल्ला झझाईने १७ चेंडूत २१ धावा केल्या. त्याने ४ चौकारही मारले. तर, रहमानउल्ला गुरबाज याने ११ चेंडूत १७ धावा ठोकल्या. त्यानंतर आलेल्या करीम जनात याने १५ चेंडूत १९ धावा केल्या. नजीबुल्ला जद्रानने संघाचा डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहम्मद रिझवाने त्याला झेलबाद केलं. नजीबुल्ला जद्रानने ३७ चेंडूत ३५ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद नबी एकही धाव न करता बाद झाला. अजमतुल्ला उमरझाईने १० चेंडूत १० धावा, तर रशीद खानने १५ चेंडूत १८ धावा केल्या.
पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. हरिस रौफने ४ षटकात २६ धावा देत २ बळी घेतले. नसीम शाहने ४ षटकात १९ धावा देत १ बळी, मोहम्मद हसनैन ४ षटकामध्ये ३४ धावा देत १ बळी, मोहम्मद नवाजने ४ षटकामध्ये २३ धावा दिल्या. तर, त्याने एक बळीही घेतला आहे. शादाब खानने १ बळी घेत ४ षटकांत २७ धावा दिल्या.