PAK vs AFG, World Cup 2023: अफगाणिस्तानने आयसीसी विश्वचषकात चेन्नईत पाकिस्तानला मोठा पराभव करून इतिहास रचला आहे. विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडूनही पराभवाचा सामना करावा लागला. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पाकिस्तानच्या या खराब कामगिरीमागील प्रमुख कारण सांगितले आहे.
गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला, “आम्ही आशिया चषकात पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणाबाबतही बोललो होतो. गोलंदाजी किंवा फलंदाजीत तुमचा दिवस वाईट असू शकतो, पण क्षेत्ररक्षणात नाही. आशिया चषकापासून त्यांचे खराब क्षेत्ररक्षण सुरू असून अजूनही त्या विभागात कोणतीही सुधारणा झालेली नाही. माझ्यामते, पाकिस्तान हा या विश्वचषकातील सर्वात सामान्यपेक्षाही वाईट क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे.”
ऑस्ट्रेलिया किंवा अफगाणिस्तानविरुद्ध याआधीच्या विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तानचे अत्यंत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने वॉर्नर आणि मार्शने पाकिस्तान संघाला सहज असे सोपे झेल दिले होते मात्र, त्यांनी ते सोडले. त्यानंतर दोघांनीही शतके झळकावली होती. तीच परिस्थिती अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी सीमारेषेवर अत्यंत खराब क्षेत्ररक्षण केले आणि चौकार चुकवले.
४२ वर्षीय माजी खेळाडू गंभीरने पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीबद्दलही चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, “ते फिरकी गोलंदाजीत संघर्ष करत आहेत. या विकेटवर, जिथे दव नव्हते आणि फिरकीपटूंना मदत होती अशा परिस्थितीचाही फायदा ते घेऊ शकले नाहीत. तीनही पाक फिरकीपटूंपैकी एकही विकेट घेऊ शकले नाहीत. ही आणखी एक चिंतेची बाब आहे.” यानंतर गंभीरने फलंदाजीतील तिसरे प्रमुख कारण सांगितले. तो म्हणाला, “तिसरी चिंतेची बाब म्हणजे पाकिस्तानची फलंदाजी आहे. पाकिस्तानचे अव्वल पाच फलंदाज हे सर्व एकाच प्रकारची फलंदाजी करणारे आहेत. त्यांच्याकडे इफ्तिखार अहमद व्यतिरिक्त कोणताही फलंदाज नाही जो पुढे येऊन मोठे फटके मारू शकेल.”
क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांना फलंदाजीत वैविध्य आणावे लागेल आणि आक्रमक दृष्टिकोनही स्वीकारावा लागेल, असे गंभीरने पाकिस्तानला सल्ला दिला आहे. तो म्हणाला, “क्रिकेट आता तसे नाही जसे पाकिस्तान संघ खेळत आहे, ते खूप पुढे गेले आहे. पाकिस्तान संघ मात्र अजूनही पूर्वीसारखाच क्रिकेट खेळत आहे. क्रिकेट आता १९९० किंवा २०११ सारखे राहिलेले नाही. जिथे तुम्ही २७० किंवा २८० धावा कराल आणि तुमची गोलंदाजी त्याचे संरक्षण करेल असे वाटते. दोन नवीन चेंडू, सपाट खेळपट्टी, थर्टी यार्ड वर्तुळात पाच क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे तुम्हाला सक्रिय आणि आक्रमक क्रिकेट खेळावे लागेल.”
पाकिस्तानकडून अफगाणी फलंदाजांनी विजय हिसकावून घेतला
पाकिस्तानने दिलेल्या २८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाण संघाचे सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावांची विक्रमी भागीदारी केली. गुरबाज ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६५ धावा करून बाद झाला. संघाला हा पहिला धक्का होता. यानंतर इब्राहिम झद्रानची दुसरी विकेट पडली. जादरान ८७ धावांची खेळी खेळली ज्यात त्याने १० चौकार मारले. यानंतर अफगाण संघाने एकही विकेट गमावली नाही आणि रहमत शाह-हशमतुल्ला शाहिदीच्या नाबाद भागीदारीच्या जोरावर संघाला ८ विकेट्सने विजय मिळवून दिला. शाहने ७७ आणि शाहिदीने ४८ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी नाबाद ९६ धावांची विजयी भागीदारी केली.