Pakistan vs Afghanistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: पाकिस्तान संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत आपला पाचवा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात प्रथम खेळताना बाबरच्या सेनेने ५० षटकात ७ विकेट गमावत २८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी पहिल्या विकेटसाठी १३० धावांची शानदार भागीदारी करत ३ मोठे विक्रम केले. या शानदार सुरुवातीमुळे पाकिस्तान संघाला धडकी भरली.
हे अफगाणिस्तान संघासाठी प्रथमच घडले –
इब्राहिम झद्रान आणि रहमानुल्ला गुरबाज यांनी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, हसन अली यांच्याविरुद्ध दमदार फटकेबाजी केली. यानंतर फिरकीपटू उसामा मीर, शादाब खान आणि इफ्तिखार अहमद अफगाणिस्तान फलंदाजांपुढे हतबल झालेले दिसले. या जोडीने शतकी भागीदारी करत काही विक्रम केले. शाहीन आफ्रिदीचा बाद करण्यापूर्वी गुरबाजने ६५ धावा केल्या. इब्राहिम झद्राननेही ८७ धावांचे शानदार अर्धशतक झळकावले. विश्वचषकाच्या एकाच डावात अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी ५० हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेत अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आणखी एक विक्रम केला आहे. इब्राहिम झद्रान आणि रहमानुल्ला गुरबाज या जोडीने आपल्याच भागीदारीचा विक्रम मोडला आहे. या दोघांनी भारताविरुद्ध केलेल्या १२१ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तासाठी आतापर्यंतच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी भागादारी नोंदवली आहे.
एकदिवसीय विश्वचषकातील अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठी भागीदारी –
१३३- इकराम अलीखिल, रहमत शाह विरुद्ध वेस्ट इंडिज (२०१९)
१३०- इब्राहिम झद्रान, रहमानउल्ला गुरबाज विरुद्ध पाकिस्तान (२०२३)
१२१- अजमतुल्ला उमरझाई, हशमतुल्ला शाहिदी विरुद्ध भारत (२०२३)
११४- इब्राहिम झद्रान, रहमानउल्ला गुरबाज विरुद्ध इंग्लंड (२०२३)
अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात १०० धावांची सर्वात जास्त वेळा भागीदारी –
४- हशमतुल्ला शाहिदी, रहमत शाह
४- इब्राहिम झद्रान, रहमानउल्ला गुरबाज
३- इब्राहिम झद्रान, रहमत शाह
अफगाणिस्तान संघाची दुसरी विकेट १९० धावांवर पडली. इब्राहिम झद्रान ११३ चेंडूत ८७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १० चौकारांचा पाऊस पाडला. त्याला हसन अलीने त्याला मोहम्मद रिझवानकरवी झेलबाद केले. या दरम्यान इब्राहिम झद्रानने अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय विश्वचषकात दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली.
हेही वाचा – World Cup 2023: ॲडम झाम्पाने कुटुंबासह ताजमहालला दिली भेट; म्हणाला, ‘विश्वास बसत नाही की…’
एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानसाठी सर्वोच्च धावसंख्या –
९६ – समिउल्ला शिनवारी विरुद्ध स्कॉटलंड, ड्युनेडिन, २०१५
८७ – इब्राहिम झद्रान विरुद्ध पाकिस्तान, चेन्नई, २०२३*
८६ – इकराम अलीखिल विरुद्ध वेस्ट इंडिज, लीड्स, २०१९
८० – हशमतुल्ला शाहिदी विरुद्ध भारत, दिल्ली, २०२३
८० – रहमानउल्ला गुरबाज विरुद्ध इंग्लंड, दिल्ली, २०२३