ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन सध्या पाकिस्तानी संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम पाहतोय. टी-२० विश्वचषकाला सुरुवात होण्याच्या आधीच हेडनची या पदावर नियुक्ती करण्यात आलीय. तो सध्या बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानी संघाला फलंदाजीचे धडे देण्यासाठी संघासोबत युएईमध्ये आहे. हेडनला फलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केल्यापासून पाकिस्तानच्या फलंदाजीमध्ये बराच सकारात्मक बदल झाल्याचं दिसून आलं आहे. टी-२० विश्वचषकामध्ये पाकिस्तानी संघ अद्याप एकाही सामन्यामध्ये पराभूत झालेला नाही. हेडन पाकिस्तानी संघाच्या खेळाबरोबरच संघातील खेळाडूंच्या धार्मिक भावना आणि अध्यात्मिक विचारांनीही प्रभावीत झालाय.
हेडनने न्यूज कॉर्प ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानी संघासोबत राहून त्यांच्या अध्यात्मिक विचारांचा आपल्यावर कसा प्रभाव पडलाय याबद्दल भाष्य केलं. हेडनने पाकिस्तानी विकेटकीपर आणि सालामीवीर मोहम्मद रिझवानने आपल्याला इंग्रजी भाषेतील कुराणची प्रत भेट म्हणून दिल्याचं हेडन म्हणालाय. ही भेट मी कधीच विसरु शकणार नाही, असं सांगताना हेडनने रिझवानची ही कृती माझ्या हृदयाला स्पर्श करुन गेल्याचंही तो म्हणालाय. हेडनने मी आणि रिझवान रोज इस्लामबद्दल चर्चा करतो असं सांगत त्याने दिलेल्या कुराणमधील थोडा थोडा भाग आपण रोज वाचत असल्याचंही स्पष्ट केलं.
नक्की वाचा >> २०१७ मध्येच क्रिकेट सोडण्याच्या विचारात असणारा खेळाडूच आज न्यूझीलंडला T20 World Cup फायनलमध्ये घेऊन गेला
“मी एक ख्रिश्चन आहे तरी…”
“रिझी (रिझवान) आणि मी हे नक्कीच सांगू शकतो की तो फार खास क्षण होता जेव्हा त्याने मला कुराणची प्रत भेट दिली. मी तो क्षण कधीच विसरु शकणार नाही. मी एक ख्रिश्चन आहे तरी मला इस्लामबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. आमच्या दोघांपैकी एक जिजस क्राइस्टला मानतो तर एक मोहम्मद (पैगंबरांना) मानतो. त्याने मला इंग्रजी भाषेत लिहिलेली कुराण भेट म्हणून दिलीय. आम्ही रोज जमीनीवर बसून दीड तास यासंदर्भात सविस्तर चर्चा करतो. मी त्यातील थोडा थोडा भाग रोज वाजतो. रिझी माझ्या आवडत्या लोकांपैकी एक आहे. तो खरोखरच एक चॅम्पियन आहे,” असं हेडन म्हणालाय.
पाकिस्तानी संघाबद्दल म्हणाला, “हे लोक फार…”
“हे लोक फार साधे आणि नम्र आहेत. मला जे अपेक्षित होतं तसं सारं सुरु आहे. संघासाठी हा काळही फार चांगला आहे. त्यांना प्रशिक्षण देणं मला फार सोप झालं आहे,” असं हेडन संघासोबतच्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाला.
नक्की वाचा >> …अन् सारा संघ विजयाचा जल्लोष करताना सामना जिंकवून देणारे मात्र खुर्च्यांवरुन हललेही नाहीत; फोटो होतोय व्हायरल
पाकिस्तानने सामना जिंकावा अशी इच्छा
आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील दुसरा उपांत्यफेरीचा सामना रंगणार आहे. पाकिस्तानी क्रिकेटसाठी टी-२० विश्वचषक जिंकणं हे फार महत्वाचं ठरणार असल्याचं हेडन म्हणतो. मागील बऱ्याच काळापासून सुरक्षेच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या पाकिस्तानला हा विजय आशादायक ठरेल असं हेडनचं म्हणणं आहे. “पाकिस्तानसाठी ही फार महत्वाची स्पर्धा आहे. आमच्याकडे सध्या खेळाडूंचा असा संघ आहे तो मैदानामध्ये उतरुन जिंकण्यासाठी सर्व प्रकार प्रयत्न करण्यास तयार आहे. केवळ उपांत्य फेरीच नाही तर इंशाअल्लाह आम्ही पुढेही अशाच प्रकारे जाऊ आणि अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवू,” असं हेडनने म्हटलं आहे.