टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये गुरुवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये मॅथ्यू वेड (१७ चेंडूंत नाबाद ४१) आणि मार्कस स्टॉइनिस (३१ चेंडूंत नाबाद ४०) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेमध्ये अजिंक्य राहिलेल्या पाकिस्तानचा महत्वाच्या सामन्यामध्येच पराभव झाल्याने ते स्पर्धेबाहेर पडले आहेत. असं असलं तरी पाकिस्तानने या विश्वचषक स्पर्धेमधील इतर सामन्यांप्रमाणेच ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज दिली.

खास करुन फलंदाजीमध्ये पाकिस्तानचे सातत्य कायम असल्याचे दिसले. त्यातही सलामीवीर मोहम्मद रिझवानने या सामन्यामध्येही चमक दाखवत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहचवण्यास मदत केली. मात्र सामन्यानंतर फलंदाजीचा प्रशिक्षक मॅथ्यू हेडनने बुधवारीच रिझवान फुफ्फुसांसंदर्भातील समस्येमुळे रुग्णालयात दाखल होता असा धक्कादायक खुलासा केला. तर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने रिझवान रुग्णालयामध्ये दाखल असतानाचा फोटो शेअर करत त्याने देशासाठी केलेल्या कामगिरीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

नक्की वाचा >> Video: पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने केली विराट, रोहित आणि राहुलची नक्कल; व्हायरल झाला व्हिडीओ

उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात रिझवानने ५२ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. रिझवानच्या याच खेळीमुळे पाकिस्तानला १२० चेंडूंमध्ये १७० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडता आला. मात्र सामन्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार याच आठवड्यात रिझवानला चेस्ट इन्फेक्शन म्हणजेच फुफ्फुसांचा संसर्ग झाला होता. मंगळवारी रिझवान आजारी पडल्यानंतर तो दोन दिवस दुबईमधील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत होता अशी माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> रिझवानने भेट म्हणून हेडनला दिली कुराणची प्रत; हेडन म्हणतो, “मी ख्रिश्चन असलो तरी…”

सोशल नेटवर्किंगवरही रिझवानचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाले आहेत. सामन्याच्या दिवशी सकाळी रिझवानला रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. “९ नोव्हेंबर रोजी रिझवानला चेस्ट इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं,” असं पाकिस्तानी संघाचे डॉक्टर नाझीबुल्ला सोमरो यांनी सांगितलं. “दोन दिवस तो आयसीयूमध्ये होता. त्याने फार वेगाने स्वत:ला सावरलं आणि सामन्याआधीच्या चाचण्यांमध्ये तो खेळण्यासाठी पात्र ठरला. देशासाठी खेळण्याची त्याची इच्छा आणि त्यासाठीची तयारी पाहून आम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्याने आपल्या खेळातून तो उत्तम असल्याचं दाखवून दिलं,” असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

शोएब अख्तरने रिझवानचा रुग्णालयामधील आयसीयू बेडवरील फोटो शेअर करत त्याचं कौतुक करत त्याला ‘हिरो’ म्हटलं आहे. “ही व्यक्ती स्वत:च्या देशासाठी आज खेळलीय आणि सर्वोत्तम कामगिरी केलीय याचा तुम्ही विचार तरी करु शकता का. मागील दोन दिवसांपासून तो रुग्णालयामध्ये होता. रिझवान तुझा फार अभिमान वाटतो,” असं अख्तरने फोटो शेअर करताना म्हटलंय.

फलंदाजीचा प्रशिक्षक मॅथ्यू हेडननेही, “रिझवान हा योद्धा आहे. त्याच्यात फार हिंमत आहे,” असं म्हटलं आहे. संघाचा कर्णधार बाबर आझमनेही रिझवानचं कौतुक केलं आहे. “तो संघासाठी खेळणारा खेळाडू आहे. त्याने आज ज्याप्रकारचा खेळ केलाय तो भन्नाट आहे. मी त्याला पहिलं तेव्हा तो थोडा थकल्यासारखा वाटत होता. मात्र मी त्याला त्याच्या तब्बेतीबद्दल विचारलं तेव्हा त्याने मला, नाही मी खेळणार आहे असं सांगितलं होतं,” अशी माहिती बाबरने दिली.

नक्की वाचा >> “बाबरबद्दल मी असं म्हणालोच नव्हतो, मी फक्त…”, पाकिस्तानी चाहत्यांनी व्हायरल केलेल्या Fake Tweet वर हर्षा भोगलेंचा भन्नाट रिप्लाय

अनोखा विक्रम
टी २० वर्ल्डकपमध्ये मोहम्मद रिझवानने ३ अर्धशतकं झळकावली आहेत. एका वर्षात टी २० स्पर्धेत १००० धावा करण्याचा विक्रमही रिझवानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्वत:च्या नावे केला आहे. एका कॅलेण्डर इयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये मोहम्मद रिझवाननंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा नंबर लागतो. त्याने एका वर्षात ८२६ धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवानने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५५ चेंडूत ७९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्ध ३४ चेंडूत ३३ धावा, अफगाणिस्तान विरुद्ध ८ धावा, नामिबिया विरुद्ध ५० चेंडूत ७९ धावा, स्कॉटलँड विरुद्ध १५ धावा केल्या होत्या. मोहम्मद रिझवानने ६ सामन्यात एकूण २८१ धावा केल्या असून दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ३०३ धावांसह बाबर आझम आहे.

Story img Loader