Pakistan vs Bangladesh, Super 4 Match Update: आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ चा पहिला सामना आज (७ सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे. यासाठी दोन्ही संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. आशिया कप २०२३ मध्ये आतापर्यंत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकला आहे. आजचा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. बांगलादेशचा संघ या सामन्यात आत्मविश्वासाने दिसू शकतो. कारण पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या ४ एकदिवसीय सामन्यांपैकी एकूण ४ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तान संघाला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. वर्ष २०१५ मध्ये, एकदिवसीय मालिकेत, बांगलादेशने मीरपूरमध्ये पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ७९ धावांनी पराभव केला होता. २ दिवसांनंतर त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. बांगलादेशचा संघ इथेच थांबला नाही त्यांनी तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. तमीम इक्बालला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे या एकदिवसीय मालिकेत ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ परितोषिक देण्यात आले होते.

आशिया कपच्या या मोसमात सुपर-४ साठी पात्र ठरणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला. त्यांनी त्यांच्या पहिल्या गट सामन्यात नेपाळला पराभूत करण्यात यश मिळवले, तर भारताविरुद्धचा त्यांचा दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. बाबर आझम अँड कंपनीला ही लय कायम ठेवून स्पर्धेच्या या टप्प्याची सुरुवात दणक्यात करायची आहे.

दुसरीकडे या स्पर्धेत बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली होती. त्यांना श्रीलंकेविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. बांगलादेशने नंतर जोरदार पुनरागमन केले, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. त्यांनी त्यांच्या गटात दुसरे स्थान पटकावले आणि त्यांना हीच विजयी घोडदौड पुढे सुरू ठेवायची आहे. शाकिब आणि त्याचे खेळाडू मागील सामन्यातील आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतील.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात नजमुल हसन शांतो जो बांगलादेशचा फॉर्म मध्ये असलेला प्रमुख फलंदाज असून तो दुखापतीमुळे तो खेळू शकणार नाही. त्याच्याजागी लिटन दासला संघात स्थान मिळाले आहे.

गद्दाफी स्टेडियम खेळपट्टी अहवाल

गद्दाफी स्टेडियम, लाहोरयेथे झालेला मागील एकदिवसीय सामन्यातील आकडेवारी पाहिल्यास, येथील खेळपट्टी तटस्थ राहिली आहे. साधारणपणे, लाहोरची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना जास्त उसळी देत ​​नाही आणि चेंडूही स्विंग होत नाही. चांगली लाईन-लेंथ असलेली गोलंदाजी आणि त्यात जर विविधता वापरली तर येथे खूप मदत मिळू शकते. खेळपट्टीच्या संथपणामुळे मधल्या षटकांमध्ये फिरकीपटू सामन्यात चांगली कामगिरी करू शकतात. लाहोरमधील ऑफ-स्पिनर्सपेक्षा लेग-स्पिनर अधिक प्रभावी ठरू शकतात. येथे आतापर्यंत एकूण ७० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करू इच्छितो. गद्दाफी स्टेडियमवर पहिल्या डावात सरासरी २५६ धावा आहेत.

हेही वाचा: Asia Cup 2023: मुथय्या मुरलीधरनचा भारताच्या मुख्य प्रशिक्षकाला खोचक टोला; म्हणाला, “द्रविड महान फलंदाज, पण माझा चेंडू…”

लाहोर येथील हवामान स्थिती

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, लाहोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात पावसाची शक्यता नाही. तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल.

दोन्ही संघांची प्लेईंग ११

पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ.

बांगलादेश: मोहम्मद नईम, मेहदी हसन मिराज, लिटन दास, तौहीद हृदयॉय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, अफिफ हुसेन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, हसन महमूद.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs ban bangladesh tigers take on pakistan shakib al hasan won the toss and elected to bat avw
Show comments