Naseem Shah Injured: आज आशिया कप २०२३च्या सुपर ४ फेरीचा पहिला सामना खेळला जात आहे. पाकिस्तानसमोर बांगलादेशचे आव्हान आहे. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला जात आहे. सुपर-४मध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत. सुपर फोरमधील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह जखमी झाला. यामुळे तो सामना अर्धवट सोडून तंबूत परतला आहे.
आशिया कपच्या सुपर-४ टप्प्यातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज त्रिकुटापैकी एक असलेला नसीम शाह जखमी झाला आहे. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना नसीमला दुखापत झाली, त्यानंतर त्याला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले.
श्रीलंकेत सुरू असलेल्या या सामन्यात नसीम सुरुवातीपासूनच प्रभावी गोलंदाज ठरत होता. त्याने पाकिस्तानला बांगलादेशची पहिली विकेट मिळवून दिली. मात्र चौकार रोखण्याच्या प्रयत्नात थर्ड मॅनकडे क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला. यादरम्यान नसीमला खूप वेदना होत असल्याचे दिसून आले, त्यानंतर त्याला सामना सोडून मैदानाबाहेर जावे लागले. त्याच्या मदतीसाठी पाकिस्तानचे फिजिओ धावून आले आणि त्यानंतर त्याला ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-४ टप्प्यातील सामना १० सप्टेंबर रोजी होणार आहे. अशा परिस्थितीत नसीमची दुखापत हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का ठरू शकतो. गट स्टेजमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातही नसीमने चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने ८.५ षटकात ३६ धावा देत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी पाकिस्तानच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत संघाची कामगिरी अत्यंत प्रभावी ठरली आहे.
नसीम शाहची आशिया कपमध्ये आतापर्यंतची कामगिरी
आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आतापर्यंत चमकदार कामगिरी करत आहे. पण नसीमची दुखापत हे पाकिस्तानसाठी वाईट लक्षण आहे. त्याचवेळी, नसीम हा आतापर्यंतच्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज आहे. नसीमने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सामन्यांत पाच विकेट्स घेतले आहेत.