PAK vs BAN 1st Test Highlights: रावळपिंडी येथे झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी खराब होती, मात्र या संघाचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने चांगली कामगिरी करत पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. रिझवानची मेहनत त्याच्या संघासाठी कामी आली नाही आणि शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर पहिल्यांदाच कसोटीत १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा – VIDEO: रागाच्या भरात कार्लाेस ब्रेथवेटने बॅटने हेल्मेटला चेंडूप्रमाणे उडवलं, हेल्मेट थेट सीमारेषेबाहेर
रिझवानने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात नाबाद १७१ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या. या कसोटीत त्याने एकूण २२२ धावा केल्या, पण एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला. पराभूत कसोटी सामन्यात पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारा रिझवान हा पहिला यष्टिरक्षक ठरला, पण एकूणच तो या बाबतीत तिसरा आला. रिझवानने ऋषभ पंत आणि अँडी फ्लॉवर यांचा विक्रम मोडीत काढला, जे यापूर्वी याबाबतीत संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर होते, परंतु दोघेही आता चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत.
पराभूत कसोटी सामन्यात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज अँडी फ्लॉवर आहे, ज्याने २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हा पराक्रम केला होता आणि ३४१ धावा केल्या होत्या. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या यादीत अँडी फ्लॉवर देखील दुसऱ्या स्थानावर होता, ज्याने २००० मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात २५३ धावा केल्या होत्या, परंतु आता या यादीत रिजवान २२२ धावांसह तिसऱ्या स्थानावर आला आहे तर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर आहे.
पराभूत झालेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक फलंदाज
३४१ धावा – अँडी फ्लॉवर (१४२, १९९) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २००१
२५३ धावा – अँडी फ्लॉवर (१८३, ७०) वि. भारत, २०००
२२२ धावा – मोहम्मद रिझवान (१७१*, ५१) विरुद्ध बांगलादेश, २०२४
२०३ धावा – अँडी फ्लॉवर (७४, १२९) विरुद्ध श्रीलंका, १९९९
२०३ धावा – ऋषभ पंत (१४६, ५७) विरुद्ध इंग्लंड, २०२२
© IE Online Media Services (P) Ltd