Mushfiqur Rahim player of match prize money donates : बांगलादेश क्रिकेट संघाने २५ ऑगस्ट रोजी रावळपिंडी येथे पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली. या संस्मरणीय विजयात बांगलादेशचा अनुभवी खेळाडू मुशफिकर रहीमने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पहिल्या डावात १९१ धावांची शानदार खेळी करत बांगलादेशला १० विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. यानंतर त्याने मोठा निर्णय घेत चाहत्यांची मनं जिकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुशफिकर रहीमने घेतला मोठा निर्णय –

सामना संपल्यानंतर मुशफिकरने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मला या विजयाने खूप आनंद झाला आहे. पण जेव्हा त्याने बक्षिसाची रक्कम बांगलादेशच्या पूरग्रस्तांना दान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचा आनंद आणखी वाढला. तो म्हणाला की, ही बक्षिसाची रक्कम अशा लोकांसाठी आहे, जे सध्या बांगलादेशातील पुरासारख्या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बांगलादेशमध्ये पुराने थैमान घातले असून, ५० लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. पुरामुळे अनेक लोक घरात अडकले असून त्यांना मदतीची गरज आहे. या कठीण काळात मुशफिकरचे हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. सामन्यानंतर त्यानी आपल्या देशातील जनतेला आवाहनही केले की, ज्यांना शक्य आहे, त्यांनी पुढे येऊन पूरग्रस्तांच्या मदत करावी.

हेही वाचा – पाकिस्तान संघातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर, शाहीन आफ्रिदी रागाने शान मसूदचा हात झटकतानाचा VIDEO व्हायरल

बांगलादेशच्या खेळाडूंनी विशेष सराव सत्रात घेतला होता भाग –

मुशफिकरने या विजयाचे श्रेय त्याच्या संपूर्ण संघाला दिले. या विजयासाठी आपल्या संघाने अथक परिश्रम केले आणि पाकिस्तानमध्ये विजय मिळवण्याचा आत्मविश्वास असल्याचे त्याने सांगितले. कसोटी सामन्याच्या तयारीसाठी संघाच्या खेळाडूंनी विशेष सराव सत्रात कसा भाग घेतला, ज्यामुळे त्यांना या ऐतिहासिक विजयात मदत झाली हे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’

इतर खेळाडू टी-२० विश्वचषकात व्यस्त असताना या विशेष सराव सत्रामुळे कसोटी संघाचे खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत झाले, असेही तो म्हणाला. या विजयानंतर बांगलादेशी क्रिकेट चाहत्यांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे आणि मुशफिकरचे योगदान या आनंदात भर घालणारे आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs ban mushfiqur rahim player of match prize money donates for flood affected people of bangladesh vbm