Pakistan vs Bangladesh, Super 4 Match Update: आज आशिया कप २०२३च्या सुपर-४ फेरीचा पहिला सामना खेळला गेला. हा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळला संपन्न झाला. आशिया चषकातील पाकिस्तानमधील हा शेवटचा सामना होता. आता पुढील सर्व सामने हे हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेत होणार आहेत. त्याआधी पाकिस्तानी संघाने बांगलादेशवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत सुपर-४मध्ये शानदार सुरुवात केली. इमाम उल हक आणि मोहम्मद रिझवान यांनी दमदार अर्धशतके झळकावत संघाला सहज विजय मिळवून दिला. हारिस रौफला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
सुपर-४ मध्ये पोहोचलेल्या चार संघांमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त भारत आणि श्रीलंकेचे संघ आहेत. सुपर फोरमधील दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने १९३ धावा केल्या. कर्णधार शाकिब अल हसन आणि मुशफिकुर रहीम यांच्या व्यतिरिक्त एकही फलंदाज पाकिस्तानी गोलंदाजीसमोर खेळपट्टीवर तक धरू शकला नाही. १९४ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. सलामीवीर फखर जमानला सुरुवात मिळाली मात्र तो त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करू शकला नाही. त्याने ३१ चेंडूत २० धावा केल्या. त्यात त्याने तीन चौकार मारले. त्याचा साथीदार इमाम उल हकने अप्रतिम अर्धशतक झळकावले पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो त्रिफळाचीत झाला. त्याने ८४ चेंडूत सर्वाधिक ७८ धावा केल्या. त्यात त्याने पाच चौकार चार षटकारांची आतिषबाजी केली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या सामन्यात लवकर बाद झाला. त्याने २२ चेंडूत एका चौकारासह १७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या विकेटकीपर मोहम्मद रिझवानने इमामला साथ देत ७९ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. त्याच्या या खेळीत त्याने सात चौकार आणि एक षटकार मारला. इमाम बाद झाल्यानंतर आगा सलमान या युवा खेळाडूने अधिक पडझड न होऊ देता २१ चेंडूत १२ धावा केल्या त्यात त्याने एक चौकार मारला. बांगलादेशकडून तस्कीन अहमद, शौर्यफुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज या तिघांनाच एक-एक विकेट घेण्यात यश मिळाले. पाकिस्तानने हे लक्ष्य ३९.३ षटकात पूर्ण केले.
तत्पूर्वी, बांगलादेशचा डाव १९३ धावांवर आटोपला आहे. बांगलादेशची अखेरची विकेट शरीफुल इस्लामच्या रूपाने पडली. नसीम शाहने त्याला क्लीन बोल्ड केले. बांगलादेशचा संघ ३८.४ षटकांत केवळ १९३ धावाच करू शकला. मुशफिकर रहीमने सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार शाकिबने ५३ धावांची खेळी खेळली. मोहम्मद नईमने २० धावांचे योगदान दिले. भारताविरुद्धच्या सामन्यात सर्व १० विकेट्स घेत इतिहास रचणाऱ्या पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांनी या सामन्यातही नऊ विकेट्स घेतल्या. हारिस रौफने चार आणि नसीम शाहने तीन विकेट्स घेतल्या. शाहीन आफ्रिदी आणि फहीम अश्रफ यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. इफ्तिखार अहमदलाही एक विकेट घेण्यात यश मिळाले.