टी-२० विश्वचषकानंतर आता पुन्हा जगभरामध्ये पुन्हा क्रिकेट मालिकांना सुरुवात झालीय. एकीकडे न्यूझीलंडचा संघ आजपासून भारत दौऱ्याला सुरुवात करणार आहे तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये पाकिस्तानी संघ दाखल झाला असून यजमान संघ आणि पाहुण्या संघामध्ये तीन टी-२० सामन्यांची मालिका लवकरच सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघ मैदानामध्ये घाम गाळताना दिसत आहेत. मात्र असं असतानाच पाकिस्तानी संघाच्या एका कृतीमुळे बांगलादेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मालिका सुरु होण्यापूर्वीच्या एका सरावादरम्यान मीरपूरच्या मैदानामध्ये पाकिस्तानी संघाने नेट्समध्येच आपला राष्ट्रध्वज लावला. यावरुनच आता वाद निर्माण झाला आहे. बांगलादेशमधील अनेक क्रिकेटप्रेमींनी पाकिस्तानी संघाने मुद्दाम खोडसाळपणा करत बांगलादेश स्वतंत्र्य होण्याच्या सुवर्ण जयंतीच्या कार्यक्रमाआधी हे राजकीय हेतूने केल्याचा आरोप केलाय.

नक्की वाचा >> T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, “वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देण्याचा निर्णय अन्यायकारक, हा पुरस्कार तर…”

अनेक देशांनी बांगलादेशचा दौरा केलाय. अनेक देश इथे येऊन सामने खेळले आहेत. मात्र कोणत्याच देशाने सरावादरम्यान आपल्या देशाचा झेंडा बांगलादेशच्या भूमीवर रोवला नाही. पाकिस्ताननेच असं का केलं? त्यांना यामधून काय सिद्ध करायचं आहे, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेत.

हा विरोध एवढा वाढला आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मागील दोन महिन्यांपासून पाकिस्तानचा संघ सरावादरम्यान आपल्या देशाचा झेंडा लावूनच सराव करत असल्याचं पीसीबीने म्हटलं आहे. या प्रकरणावर अद्याप बांगलादेश क्रिकेट बोर्डाने कोणतीची प्रतिक्रिया दिलेली नाही.

नक्की वाचा >> विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर ‘तो’ म्हणाला, “३३५ दिवस”; पण या ट्विटचा अर्थ काय?

सोशल मीडियावर मात्र पाकिस्तानच्या संघाला फार ट्रोल केलं जात आहे. सरावादरम्यान पाकिस्तानचा झेंडा लावू नये, लावलेला झेंडा काढून टाकावा अशी मागणी केली जात आहे. काही युझर्सने हा प्रकार लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर टोकाची भूमिका घेत पाकिस्तानविरुद्धची मालिका रद्द करुन या अशा प्रकारांविरोधात सरकार कठोर असल्याचा संदेश द्यावा असंही म्हटलंय. पाकिस्तानी खेळाडूंना त्यांच्या या कृतीसाठी देशातून हकलवून द्यावं अशीही मागणी अनेकांनी केलीय.

नक्की पाहा >> संपूर्ण जग कौतुक करत असताना वॉर्नर मात्र विल्यमसनच्या कामगिरीवर झाला फिदा; Insta Story चा Screenshot व्हायरल

खेळाबद्दल बोलायचं झाल्यास सध्या पाकिस्तानचा संघ तुफान फॉर्ममध्ये असून दमदार कामगिरी करतोय. पाकिस्तानच्या संघाने टी-२० विश्वचषकामध्ये साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून दुसऱ्या गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. मात्र उपांत्यफेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केलं होतं.

Story img Loader