Mohammed Rizwan Double Century Missed in PAK vs BAN Test: पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने बांगलादेशविरूद्धच्या कसोटीत आपल्या शतकांचा दुष्काळ संपवला. बांगलादेशविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीच्या पहिल्या डावात रिझवानने १७१ धावा करत खेळत होता. शतक झळकावणाऱ्या सौद शकीलसोबत त्याने महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रिझवानला द्विशतक झळकावण्याची मोठी संधी होती. पण रिझवानने द्विशतक पूर्ण करण्याआधीच कर्णधार शान मसूदने पाकिस्तानचा डाव घोषित केला. यावरून आता पाकिस्तानच्या कर्णधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यावर आता उपकर्णधार सौद शकीलने नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

हेही वाचा – ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?

शान मसूदने मुद्दाम मोहम्मद रिझवानचे द्विशतक होऊ दिले नाही?

रिझवान द्विशतकाच्या दिशेने असताना पाकिस्तानचा डाव घोषित करण्याच्या शान मसूदच्या या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. चाहत्यांनी तर सोशल मीडियावर म्हटले की, मसूदने मुद्दाम रिजवानचे द्विशतका होऊ दिले नाही. तर काहींनी मसूदला स्वार्थी म्हटले आहे. सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेल्या संघाचा उपकर्णधार सौद शकीलने शान मसूदने डाव घोषित करण्याच्या निर्णयामागचे कारण सांगितले.

शकीलने सांगितले की, “संघ कधी डाव घोषित करणार आहे, हे रिझवानला आधीच माहित होते. पाकिस्तानचा उपकर्णधार म्हणाला, ‘जोपर्यंत रिझवान भाईच्या द्विशतकाचा प्रश्न आहे, मी हे स्पष्ट करतो की डाव घोषित करण्याचा निर्णय घाईघाईने घेतला गेला नाही. संघ नेमका कधी डाव घोषित करणार हे रिजवानला दीड तास आधीच माहीत होते. आम्ही डाव घोषित करण्यापूर्वी ४५० धावांच्या आसपास आकडा गाठण्याच्या प्रयत्नात होतो.”

हेही वाचा – KL Rahul: केएल राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती? काय आहे व्हायरल इन्स्टाग्राम स्टोरीमागचं सत्य

मोहम्मद रिझवान आणि सौद शकीलची शतकी खेळी

यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि उपकर्णधार सौद शकील यांनी पाचव्या विकेटसाठी २४० धावांची भागीदारी केली. पाकिस्तानने पहिला डाव ४४८ धावांवर घोषित केला. रिजवानने २३९ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह १७१ धावांची खेळी केली. रिझवानच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वात मोठी खेळी होती. शकीलने रेड बॉल फॉरमॅटमध्ये आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत २६१ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने १४१ धावा केल्या. रिजवान पाकिस्तानसाठी कसोटीत तिसरा सर्वाधिक धावा करणारा यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे.

हेही वाचा – Australia U19 Women’s Squad: भारतीय वंशाच्या लेकी कांगारू संघात, पाहा कोण आहेत या खेळाडू?

पाकिस्तानात द्विशतकापूर्वी डाव घोषित करण्याचा इतिहास

पाकिस्तानमध्ये कसोटीत द्विशतक नाकारणं, हे पूर्वीही घडलं आहे. त्यामुले पाकिस्तानात द्विशतक पूर्ण होण्याआधी डाव घोषित करणं हे ऐतिहासिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. २९ मार्च २००४ रोजी मुल्तान येथे पाकिस्तान विरुद्ध कसोटीत भारताचा डाव ६७५ धावांवर घोषित करण्यात आला. तेव्हा सचिन तेंडुलकर १९४ धावांवर फलंदाजी करत होता, वीरेंद्र सेहवागने ३०९ धावांची शानदार खेळी केली होती. राहुल द्रविडने सचिन तेंडुलकर १९४ धावांवर खेळत असताना भारताचा डाव घोषित केला होता. सचिनला फक्त द्विशतकासाठी ६ धावा हव्या होत्या. तर त्यानंतर आता या यादीत मोहम्मद रिझवानचे नावही आले आहे.