Ramiz Raja slams Pakistan team and Management : दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा यांनी रविवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर आणि संघ व्यवस्थापनावर जोरदार निशाणा साधला आहे. राजा यांनी पाकिस्तान क्रिकेट संघातील खराब संघनिवड आणि उणिवांकडे लक्ष वेधले. रमीझ राजा यांनी सांगितले की, आशिया कप २०२३ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचा पर्दाफाश केला होता. तेव्हापासून वेगवान आक्रमण लयीत नाही.
रमीझ राजा आपल्या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तान क्रिकेट संघाबद्दल म्हणाले, “सर्व प्रथम संघ निवडीत चूक झाली. हा संघ स्पिनरशिवाय मैदानात उतरला होता. दुसरी गोष्ट म्हणजे, आम्ही आमच्या वेगवान गोलंदाजांवर अवलंबून असलेली प्रतिष्ठा गमावली आहे. आशिया चषकादरम्यान भारताने वेगवान गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर धुलाई केल्याने मनोबल घसरण्यास सुरुवात झाली.
बांगलादेशचे वेगवान गोलंदाज अधिक आक्रमक दिसले –
रमीझ राजा यांनी पाकिस्तानी गोलंदाजांबद्दल पुढे सांगितले की, “भारतीय फलंदाजांनी धुलाई केल्याने पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचे गुपित जगाला कळले. आता सर्वांना माहित की पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आक्रमण करणे. त्यांचा वेग कमी झाला आहे आणि त्याचं कौशल्यही कमी झालं आहे. या सामन्यात पाकिस्तानपेक्षा बांगलादेशचे वेगवान गोलंदाज अधिक आक्रमक दिसले. त्याचबरोर १२५ ते १३५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या आमच्या गोलंदाजांविरुद्ध खंबीरपणे उभे राहिले आणि चांगल्या प्रकारे सामना.”
हेही वाचा – पाकिस्तान संघातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर, शाहीन आफ्रिदी रागाने शान मसूदचा हात झटकतानाचा VIDEO व्हायरल
शान मसूदच्या नेतृत्त्वावर रमीझ राजा काय म्हणाले?
पीसीबीचे माजी अध्यक्ष यांनी शान मसूदच्या नेतृत्त्वावर आणि त्याच्या खराब फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “शान मसूद सध्या सतत पराभवाचा सामना करत आहे. मला वाटले की ऑस्ट्रेलियन परिस्थितीत गोष्टी कठीण आहेत आणि पाकिस्तान संघ तेथे मालिका जिंकू शकत नाही. पण आता तुम्ही घरच्या परिस्थितीत बांगलादेशसारख्या संघाविरुद्ध हरत आहात. कारण तुम्हाला खेळपट्टी नीट समजली नाही. फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली नाही आणि गोलंदाजांनीही अत्यंत खराब कामगिरी केली. मसूदला आपल्या फलंदाजीत सुधारणा करावी लागेल आणि खेळाची समज आहे, हे दाखवून द्यावे लागेल.”
शान मसूदला त्याच्या फलंदाजीवर काम करण्याची गरज –
रमीझ राजा पुढे म्हणाले, “शान मसूदला त्याच्या फलंदाजीवर काम करण्याची गरज आहे. तो महान कर्णधार आहे असे नाही आणि त्यामुळे तो शून्यावर बाद होत राहिला, तरी त्याला संघात स्थान मिळेल. पराभवामुळे संघ आणि संघाच्या मनोबलावर मोठा परिणाम होतो. तुम्ही मालिका गमावू शकत नाही. पाकिस्तान क्रिकेट आधीच खूप दबावाखाली आहे. मालिका गमावली म्हणजे ड्रेसिंग रुममध्ये तणाव निर्माण होईल, बरीच टीका आणि प्रश्न उपस्थित होतील.”