PAK vs BAN Test Series Ahmad Shahzad statement on Pakistan defeat : बांगलादेशने मंगळवारी रावळपिंडीत झालेल्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. यासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ऐतिहासिक विजय नोंदवला. घरच्या मैदानावर खेळताना झालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडिया विविध प्रकारच्या मीम्स शेअर चाहते खेळाडू आणि पीसीबीसह पंतप्रधानांनाही ट्रोल करत आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू अहमद शहजादने आपल्या संघाला चांगलेच फटकारले आहे.
अहमद शहजादने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, “बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच घरच्या मैदानावर व्हाईटवॉश केले. अरे भाई, तुम्हाला काय येतच नाही. अशाने तुमच्याकडून काही होणारच नाही. त्यामुळे आता तुम्हाला काय म्हणायचं. बांगलादेशने त्यांचा सरावही इथे येऊन केला. कारण त्यांच्या देशातील परिस्थितीही चांगली नव्हती.”
अहमद शहजादकडून बांगलादेश संघाचे कौतुक –
शहजाद पुढे म्हणतो, “बांगलादेशने काय क्रिकेट खेळले. त्यांनी कशा प्रकारे फलंदाजी आणि गोलंदाजी केली. त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यानंतर त्यांच्या फलंदाजांनी दाखवून दिले की कसोटी क्रिकेट कसे खेळायचे असते. तुम्ही घरचा संघ खेळपट्टी अशी नको तशी असावी, असे म्हणत असताना त्याच खेळपट्टीवर बांगलादेशचे खेळाडू फलंदाजी करत होते, तेव्हा ही खेळपट्टी सपाट असल्यासारखी वाटत होती.”
बांगलादेश क्रिकेट संघाने घडवला इतिहास –
पाकिस्तानच्या कसोटी इतिहासात प्रथमच बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला आहे. या मालिकेत त्यांनी प्रथमच कसोटीत पराभवाचा विक्रमही केला. पाकिस्तान क्रिकेटसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. पाकिस्तानला खराब फिल्डिंग आणि साधारण फलंदाजी या बाबींचा मोठा फटका बसला. आतापर्यंत मोठे संघ पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करायचे, पण आज बांगलादेशसारख्या संघानेही पाकिस्तानचा पराभव केला आहे. बांगलादेशसारखा छोटा संघ क्रिकेटच्या या फॉरमॅटवर जास्त लक्ष केंद्रित करत नाही, पण तरीही त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत वर्चस्व राखले आणि मालिका २-० अशी जिंकली.