PAK vs ENG Pakistan won the Test series at home after 3 years: पाकिस्तानने मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडला हरवून इतिहास घडवला. रावळपिंडीच्या क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर २०२१ नंतर पाकिस्तानचा मायदेशातील पहिला कसोटी मालिका विजय ठरला आहे. या सामन्यात साजिद आणि नोमान अली यांनी पाकिसान संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. विशेष म्हणजे या मालिकेतील पहिला सामना गमावल्याने पाकिस्तान संघावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघात मोठा बदल केला. याबरोबरच सलग दोन सामन्यात इंग्लंडला लोळवत मालिका विजयावर २-१ ने शिक्कामोर्तब केला.
या सामन्यातील पहिल्या डावात साजिद खानने पाकिस्तानसाठी गोलंदाजी करताना ६ विकेट्स घेतल्या आणि ४८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर दुसऱ्या डावात साजिदने ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय नोमान अलीने पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करताना ४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात नोमानने ६ विकेट घेतल्या.
पाकिस्तान क्रिकेट संघाने पहिला सामना गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या सामन्यानंतर तिसऱ्या सामन्यातही त्याने शानदार विजय नोंदवला आणि मालिका २-१ अशी जिंकली. इंग्लंडने पहिल्या डावात २६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ३४४ धावा केल्या. यानंतर पाकिस्ताने इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या ११२ धावांत गुंडाळला. ज्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या डावात केवळ ३६ धावांचे लक्ष्य मिळाले, जे पाकिस्ताने ३.१ षटकांत एक गडी गमावून पूर्ण केले. म्हणजेच हा सामना जिंकण्यासाठी फक्त १९ चेंडू लागले.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तान संघाला १४ धावांवर पहिला धक्का बसला. सॅम अयुबला ८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर जॅक लीचने एलबीडब्ल्यू केले. यानंतर अब्दुल्ला शफीक आणि शान मसूद यांनी कोणताही धक्का बसू दिला नाही. शफिक ५ धावांवर नाबाद राहिला तर कर्णधार शान मसूदने ६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार लगावत २३ धावांची नाबाद खेळी खेळली. अशा प्रकारे शान मसूदने आपल्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाला पहिला कसोटी सामना जिंकून दिला.
© IE Online Media Services (P) Ltd