PAK vs ENG 1st Test Aamir Jamal Stunning Catch Video Viral: क्रिकेटच्या खेळात प्रत्येक सामन्यात अनेक झेल घेतले जातात, पण यामध्ये असे काही झेल असतात, जे पाहून तोंडातून एकच शब्द बाहेर पडतो, ‘वाह’. असाच एक झेल पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक आमिर जमालने हवेत डायव्हिंग करताना अप्रतिम झेल घेतला. जमालने अवघ्या काही सेकंदात प्रतिक्रिया देत इंग्लिश कर्णधार ऑली पोपचा डाव संपुष्टात आणला. ज्यामुळे पोप पुन्हा एकदा फलंदाजीत छाप पाडण्यात अपयशी ठरला आणि खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. आता या झेलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आमिर जमालने घेतला आश्चर्यकारक झेल –
पाकिस्तानने पहिल्या डावात केलेल्या ५५६ धावांच्या प्रत्युत्तरात ऑली पोप आणि जॅक क्रॉली ही सलामीची जोडी इंग्लंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली. दुसऱ्या षटकात ऑली पोपला नसीम शाहने शॉर्ट पीच चेडूं टाकला, ज्याचा इंग्लिश कर्णधाराने पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. पोपने चेंडू जोरात मारला, यानंतर आमिर जमालने हवेत उंच उडी मारली आणि त्याच्या दिशेने वेगाने येणाऱ्या चेंडू एका हाताने झेलला. जमालने हा झेल कसा घेतला? यावर इंग्लिश कर्णधाराचा विश्वास बसत नव्हता, हे त्याचा हावभावातून स्पष्ट होत होते.
दुसऱ्या दिवशीही सामन्यावर पाकिस्तानच्या फलंदाजांचे वर्चस्व राहिले –
कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही पाकिस्तानच्या फलंदाजांचे वर्चस्व कायम राहिले. संघाने पहिल्या डावात स्कोअर बोर्डवर ५५६ धावा लावल्या. शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक यांच्या शतकांनंतर खालच्या फळीतील आगा सलमाननेही शानदार फलंदाजी केली. आगा सलमानने ११९ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी साकारली. सलमानने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकले. तत्पूर्वी, कसोटीच्या पहिल्या दिवशी मसूद आणि शफीक यांनी इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मसूदने १७७ चेंडूत १५१ धावांची दमदार खेळी केली. तर शफीकने १८४ चेंडूत १०२ धावांची शानदार खेळी केली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी २५३ धावांची भागीदारी केली आणि अनेक मोठे विक्रम केले.
हेही वाचा – IML 2024 : सचिन-लारासह ‘हे’ दिग्गज पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज! ‘या’ लीगमध्ये होणार सहभागी
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाकिस्तानचा पहिला डाव ५५६ धावांवर आटोपला, याला प्रत्युत्तरात इंग्लंडने एक विकेट गमावून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ९६ धावा केल्या आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जॅक क्रॉली ६४ आणि जो रुट ३२ धावांसह खेळत होते. इंग्लंडला पहिला धक्का कर्णधार ऑली पोपच्या रूपाने बसला जो खाते न उघडताच बाद झाला. पोपला बाद करून नसीम शाहने इंग्लंडला सुरुवातीचा धक्का दिला, पण आता क्रॉली आणि रूटने दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करून संघाला धक्क्यातून सावरले आहे.