PAK vs ENG Shan Masood reaction to Pakistan defeat in Multan : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना मुलतान येथे पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा घरच्या मैदानावर एक डाव आणि ४७ धावांनी दारुण पराभव केला. विशेष म्हणजे या सामन्यातील पहिल्या डावात पाकिस्तानने ५५६ धावा केल्या होत्या. आता या पराभवार कर्णधार शान मसूदने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, पाकिस्तान संघाला जिंकण्याची मानसिकता ठेवावी लागेल. तसेच त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांवर आणि गोलंदाजांवर नाराजी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचबरोबर त्याने विजयाचे श्रेय इंग्लंडला दिले आणि त्यांचे कौतुक केले. तसेच कोणत्याही खेळपट्टीवर कसे जिंकायचे हे इंग्लंडकडून शिकण्याची गरज आहे, असे म्हणाला. सामन्यानंतर शान मसूद म्हणाला, ‘आम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या डावाबद्दल बोललो आहे, पण शेवटी हा सांघिक खेळ आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात, जेव्हा तुम्ही धावफलंकावर ५५० धावा लावता, तेव्हा तुम्ही १० विकेट्स घेऊन त्याचा बचाव करणे पण महत्त्वाचे असते. आम्ही हे करू शकलो नाही.’

शान मसूद काय म्हणाला?

पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला, ‘जर आम्ही १० विकेट्स घेतल्या असत्या आणि इंग्लंडची धावसंख्या आमच्या आसपास असती तर पाचव्या दिवशी २२० धावा करणे कठीण झाले असते. त्यामुळे आता आम्हाला यावर एक संघ म्हणून काम करावे लागेल. पहिल्या डावातील फलंदाजी आणि गोलंदाजीतून संघाला काय योगदान मिळाले? आगामी काळात त्यात सुधारणा होणे अपेक्षित आहे. आम्ही या गोष्टीत संघर्ष करत आहोत, आम्ही चांगल्या स्थितीत येत आहोत, पण आता सामना कसा फिनिश करायचा हे पाहावे लागेल. तुमच्याकडे किती आघाडी आहे त्यानुसार दुसऱ्या डावात २२० धावा ही चांगली धावसंख्या ठरू शकते.’

हेही वाचा – PAK vs ENG: पाकिस्तानचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

शान मसूद पुढे म्हणाला, ‘इंग्लंडकडूनही आपण शिकू शकतो. त्यांनी २० विकेट्स घेण्याचे मार्ग शोधले आहेत. एक संघ म्हणून आम्हाला दुसऱ्या डावात आमच्या फलंदाजीवर काम करावे लागेल आणि २० विकेट्स घ्यायला शिकावे लागेल. आगामी काळात हे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल. आम्ही मालिकेच्या मध्यभागी पोहोचलो असून संघातील मानसिकता आणि सातत्य याबद्दल बोलत आलो आहोत. जिथे आपल्याला अधिक चांगले होणे आवश्यक आहे. खेळपट्टी कोणतीही असो, जिंकण्यासाठी मार्ग शोधावे लागतात, हे इंग्लंडने दाखवून दिले आहे.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak vs eng at the end of the day it is a team game shan masood after embarrissing defeat against england in multan test match vbm