IND vs NZ Ben Stokes loses bat gets stumped video viral : पाकिस्तान संघाची मायदेशात कसोटी जिंकण्याची प्रतीक्षा १३४८ दिवसांनंतर संपली आहे. मुलतान येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा १५२ धावांनी पराभव केला. इंग्लंडला दुसऱ्या डावात केवळ १४४ धावांची करता आल्या आणि परिणामी पाकिस्तानने मुलतान कसोटी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बरं, इंग्लंडच्या या पराभवादरम्यान त्याचा कर्णधार बेन स्टोक्स अतिशय विचित्र पद्धतीने बाद झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नक्की काय झालं? जाणून घेऊया.
डावखुरा फिरकी गोलंदाज नौमान अलीच्या चेंडूवर बेन स्टोक्सने गगनचुंबी षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर बराच वळला, ज्याचा बेन स्टोक्सला अंदाज आला नाही. त्याने जेव्हा मोठा फटका मारण्यासाठी बॅट घुमवली, तेव्हा ती त्याच्या हातातून निसटली आणि खूप दूर पडली आणि यष्टीमागे रिझवानने यष्टीचीत केले. बेन स्टोक्सच्या हातातून निघालेली बॅट कोणत्याही पाकिस्तानी क्षेत्ररक्षकाला लागली असती. विशेषतः शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या खेळाडूला धोका होता. मात्र, सुदैवाने स्टोक्सची बॅट कोणत्याही खेळाडूच्या डोक्याला लागली नाही.
बेन स्टोक्सचा व्हिडीओ व्हायरल –
पाकिस्तानने मालिकेत साधली बरोबरी –
सामन्याबद्दल बोलायचे तर, मुलतानच्या सपाट खेळपट्टीवर ५५६ धावांचा डोंगर उभारूनही अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलेल्या पाकिस्तानने अवघ्या तीन दिवसात किमयागार असा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे त्याच मुलतानच्या भूमीवर पाकिस्तानने बॅझबॉल पवित्र्यासह खेळणाऱ्या इंग्लंडला चीतपट करण्याची किमया केली आहे. या विजयामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. तिसरी कसोटी रावळपिंडी इथे होणार आहे.
मुलतान इथे झालेल्या पहिल्या कसोटीत पाकिस्तानने पहिल्या डावात ५५६ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने ८२३ धावा करत पाकिस्तानला नामोहरम केलं. पाकिस्तानचा दुसरा डाव झटपट गुंडाळत इंग्लंडने अविश्वसनीय असा डावाच्या फरकाने विजय मिळवला. या विजयाने असंख्य नवे विक्रम प्रस्थापित झाले. प्रचंड उकाड्यात आणि आर्द्र वातावरणात दमदार खेळ करणाऱ्या इंग्लंडचं कौतुक झालं तर घरच्या मैदानावर सुमार खेळ करणाऱ्या पाकिस्तान संघावर प्रचंड टीका झाली होती.