पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानावर खेळला जात आहे. रावळपिंडीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत अनुकूल ठरली आहे. त्यामुळे प्रामुख्याने उजव्या हाताने फलंदाजी करणारा जो रुट, या सामन्यात चक्क डाव्या हाताने फलंदाजी करता दिसला. जो रुटचा डाव्या हाताने फलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जो रूट पाकिस्तानी गोलंदाज झाहिद महमूदच्या गोलंदाजीवर डाव्या हाताने फलंदाजी करताना दिसला ज्यामुळे समालोचक नासिर हुसेनही अवाक झाले. रूट हा डावखुरा फलंदाज बनला आहे. हे मी जे पाहतोय ते कौतुकास्पद आहे. कदाचित त्याच्यासाठी उजव्या हाताने फलंदाजी करणे खूप सोपे आहे, असे नासिर हुसेन म्हणाला.
ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी काळ ठरली आहे. तरी देखील या खेळपट्टीवर पहिल्या डावात जो रूट फ्लॉप ठरला होता. कसोटी क्रिकेटचा नंबर १ फलंदाज जो रूट पहिल्या डावात केवळ २३ धावा करून बाद झाला. पण दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाल्यावर त्याने आपल्या शानदार फलंदाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.
झाहिद महमूदच्या गोलंदाजीवर झेलबाद होण्यापूर्वी रूटने ६९ चेंडूत ७३ धावा केल्या. दुसरीकडे, आत्तापर्यंत झालेल्या या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, या खेळपट्टीवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत एकूण ६५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाने बाबर आझम, इमाम-उल-हक आणि असद शफीक यांच्या शतकांच्या जोरावर ५७९ धावा केल्या. वृत्त लिहेपर्यंत इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ७ गडी गमावून २६४ धावा केल्या आहेत.