Mohammad Amir angry on Ramiz Raja statement : पाकिस्तानने कसोटी मालिकेत इंग्लंडचा २-१ ने पराभव केला. २०२१ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान संघ मायदेशात मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. तसेच चार वर्षांनंतर शान मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने कसोटी मालिका जिंकली आहे. त्याचवेळी, पाकिस्तानच्या विजयानंतर समालोचक रमीझ राजा यांनी पाकिस्तानी कर्णधार शान मसूदशी संवाद साधला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संभाषणादरम्यान रमीझ राजा पाकिस्तानी कर्णधाराबद्दल बरेच काही बोलताना दिसला. त्यामुळे पाकिस्तानी चाहते निराश झाले असून माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद आमिरही चांगलाच संतापला आहे.
रमीझ राजा काय म्हणाला?
खरं तर, लाइव्ह टीव्हीवरील मुलाखतीदरम्यान रमीझ राजाने शान मसूदला म्हणाला की, “आता दोन गोष्टींवर लक्ष ठेवले जाईल, एक म्हणजे तुम्ही सीम स्थितीत कसे खेळाल आणि दुसरे म्हणजे हा फक्त तुक्का आहे की पुढे देखील अशी कामगिरी होईल. असे बोलून रमीझ राजा हसायला लागतो. यावर शान मसूद थोडा निराश होतो पण प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतो की “रमीज भाई हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आम्हाला आमच्या देशासाठी आणि चाहत्यांसाठी जिंकायचे होते. आता मी पाकिस्तान संघ जिंकल्याने खूप आनंदी आहे.” ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मोहम्मद आमिरने रमीझ राजाला फटकारले –
आता मोहम्मद आमिरने रमीझ राजा आणि शान मसूदच्या या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना, माजी पाकिस्तानी कर्णधाराला फटकारले आहे. तो म्हणाला, “मीही पाहत होतो. मला वाटते की पाकिस्तान बोर्डानेही ते पाहिले असेल आणि ते रमीझ राजा यांच्यावरही कारवाई करतील. तुम्ही बघा, पाकिस्तानने शानदार विजय मिळला होता. तिथे जवळच कर्णधार शान मसूद बसला होता आणि एक अँकर पण होती. तुमच्या जवळ विजयी कर्णधार आला आहे. अशावेळी तुम्ही त्याला असे प्रश्न विचारले पाहिजेत, जे संघाला आणखी प्रेरणा देतील. तुम्ही त्याला सकारात्मक प्रश्न विचारले पाहिजेत… ना की तुम्ही असे का केले…तुम्ही असेच शॉट का मारले?”
‘तुम्ही सुशिक्षित आहात…’ –
मोहम्मद आमिर पुढे म्हणाला, “तुम्ही मालिका जिंकली आहे, तुमच्या पुढील योजना काय असतील. त्याबद्दल विचारा, तुम्ही विजयी कर्णधाराची खिल्ली उडवत आहात. तुम्ही ते कसे केले याबद्दल प्रश्न विचारता. ६-० असा विक्रम कसा केला होता? तुम्ही हे कसे विचारु शकता. तुम्ही सुशिक्षित आहात आणि तुमचे वर्तन पण सुशिक्षित लोकांसारखेच असले पाहिजे. तुम्ही हे कसले प्रश्न विचारताय? तुमचा संघ विजयी ठरला आहे, त्याचे श्रेय त्यांना द्यायचे सोडून तुम्ही त्यांच्या चुका काढत होता.”
आमिर पुढे म्हणाला, “मी ती मुलाखत पाहिली, मला खूप वाईट वाटले. किती दिवस झाले तुम्ही कॉमेंट्री करत आहात… माईक धरून तुम्ही अशा खेळाडूला प्रश्न विचारत आहात, ज्याने तुम्हाला कसोटी जिंकून दिली. तुम्ही विजयी कर्णधाराशी बोलत आहात. तुम्हाला कर्णधाराशी कसं बोलावं तेही समजत नाही. मला खात्री आहे की शानला वाईट वाटले असेल… पण तो इतका शिकलेला मुलगा आहे की त्याने प्रतिक्रिया दिली नाही. पण ती मुलाखत बघून मला खूप वाईट वाटत होतं. आज मी हा व्हिडिओ बनवला आहे कारण मला वाटते की आमच्या खेळाडूंनी हा विजय साजरा करावा आणि अशा गोष्टींवर विचार करत बसू नये, त्यांना विजयाचे पूर्ण श्रेय मिळायला हवे.”