Shan Masood scored the 2nd fastest Test century for Pakistan against England : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदचे वेगळे रूप मुलतान स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या सामन्यात पाहायला मिळाले, जिथे त्याने आपल्या संघाचे नेतृत्व करताना कारकिर्दीतील सर्वात जलद शतक झळकावले. या सामन्यात पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली होती, गस ऍटकिन्सनने सॅम अयुबला लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते, परंतु यानंतर मसूदने अब्दुल्ला शफीकच्या साथीने डाव सांभाळला आणि दुसऱ्या विकेटसाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी केली.
मसूदने १५२४ दिवसांचा दुष्काळ संपवला –
या शतकासह त्याने बांगलादेशविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावल्यानंतर टीका करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. कर्णधार शान मसूदने १०२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे. मसूदच्या खेळीत दहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. १५२४ दिवसांनंतर मसूदचे हे पहिले शतक आहे. विशेष म्हणजे त्याने शेवटचे शतकही इंग्लंडविरुद्धच झळकावले होते, जे त्याने २०२० मध्ये मँचेस्टरमध्ये झळकावले होते. मसूदने आतापर्यंत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. कारण तो बराच काळ पाकिस्तान संघातून आत-बाहेर झाला होता. दरम्यान, आता त्याला कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारीही स्वीकारावी लागली आहे.
मसूदचे शतक हे पाकिस्तानसाठी दुसरे सर्वात वेगवान शतक –
शान मसूदने इंग्लंडला सुरुवातीच्या विकेट्सचा फायदा घेऊ दिला नाही. त्याने खेळपट्टीवर तळ ठोखते मैदानाच्या चारही दिशेला फटकेबाजी करत धावा केल्या. शानने या शतकासह इतिहास लिहिला आहे. तो पाकिस्तानसाठी मिसबाह उल हकनंतर सर्वात वेगवान शतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. मिसबाह उल हकने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५६ चेंडूत शतक झळकावले होते. शान मसूदने आता पाकिस्तानचा कर्णधार म्हणून दुसरे जलद शतक झळकावण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या यादीत मिसबाह पहिल्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, जेव्हा मिसबाहने कसोटी क्रिकेटमध्ये संयुक्त सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम केला तेव्हा त्याने महान क्रिकेटपटू व्हिव्ह रिचर्ड्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
हेही वाचा – IND vs BAN : भारताने पाकिस्तानला मागे टाकत केला विश्वविक्रम! नोंदवला ‘हा’ खास पराक्रम
सामन्याबद्दल बोलायचे तर पाकिस्तान नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसरार पाकिस्तान संघाने पहिल्या डावात ७४ षटकानंतर ३ बाद २९८ धावा केल्या आहेत. कर्णधार शान मसूदने दीडशतक झळकावून बाद झाला. त्याने १७७ चेंडूचा सामना करताना १३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १५१ धावांचे योगदान दिले. अब्दुल्ला शफीक आणि शान मसूद यांची २५३ धावांची भागीदारी ॲटकिन्सनने मोडली. शफीकने १८४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०२ धावांची खेळी साकारली. सध्या बाबर आझम (२१) आणि सौद शकील (१५) धावांवर नाबाद आहेत.